१८ व्या आशियाई खेळांची सुरुवात भारतीय महिला कबड्डी संघाने धडाक्यात केली आहे. स्पर्धेत आपला पहिला सामना खेळणाऱ्या भारतीय महिलांनी जपानचा ४३-१२ असा धुव्वा उडवला. अभिलाषा म्हात्रेच्या अनुपस्थितीत सेनादलाच्या पायल चौधरीने आजच्या सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं. संपूर्ण सामन्यात भारतीय महिलांनी आपलं वर्चस्व कायम राखत जपानच्या महिलांना सामन्यात डोकं वर काढण्याचीही संधी दिली नाही.

पहिल्या सत्रात भारताच्या चढाईपटूंनी आक्रमक खेळ करत आघाडी घेतली. मात्र जपानच्या बचावपटूंनी सामन्यात सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करत भारताच्या काही प्रमुख खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. बचावपटूंच्या या कामगिरीच्या जोरावर जपानच्या महिलांनी सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र साक्षी कुमार आणि पायल चौधरी यांच्या खेळामुळे भारताने सामन्यावरील आपली पकड ढिली होऊ दिली नाही. पहिल्या सत्रात जपानच्या संघाला सर्वबाद करत भारतीय महिलांनी सामन्यात १९-८ अशी भक्कम आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रात जपानच्या खेळाडूंनी आपली सर्व शस्त्र टाकून भारतासमोर शरणागती पत्करण पसंत केलं. पायल चौधरी, साक्षी कुमार, सोनाली शिंगटे या खेळाडूंनी जपानच्या महिलांना अक्षरशः नाकीनऊ आणले. दुसऱ्या सत्रातही जपानने काही चांगल्या पकडी करुन गुण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत भारतीय महिलांनी सामन्यात भक्कम आघाडी घेतली होती. अखेर भारतीय महिलांनी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली.