24 January 2020

News Flash

Asian Games 2018 : कबड्डीत भारताचं हक्काचं सुवर्णपदक हुकलं, उपांत्य सामन्यात इराणची भारतावर मात

भारत कांस्यपदकासाठी खेळणार

(संग्रहीत छायाचित्र)

आशियाई खेळांच्या पाचव्या दिवशी सर्वात धक्कादायक निकालाची नोंद करण्यात आलेली आहे. सातवेळा स्पर्धेचं विजेतेपद मिळवणाऱ्या भारताला इराणने उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवाचा धक्का दिला आहे. भक्कम बचावाच्या आधारावर इराणने भारतावर २७-१८ अशी ९ गुणांच्या फरकाने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

अवश्य वाचा – Asian Games 2018 Kabaddi : भारतीय महिला संघ अंतिम फेरीत, उपांत्य फेरीत चीन तैपेईचा केला पराभव

पहिल्या सत्रात भारतीय चढाईपटूंनी चांगली सुरुवात केली होती. रिशांक देवाडीगाने केलेल्या आक्रमक चढायांमुळे भारताने ६-१ अशी भक्कम आघाडी घेतली होती. मात्र आपल्या संघाची सुरुवातीला होत असलेली वाताहत पाहून इराणच्या प्रशिक्षकांनी अबुफजल मग्शदुलूला संघात जागा दिली. यानंतर इराणच्या खेळात अमुलाग्र बदल झालेला दिसले. फैजल अत्राचली, अबुझार मेघानी, मोहसीन मग्शदुलू यांनी बचावात सुपर टॅकल करत इराणला बरोबरी साधून दिली. भारताच्या प्रदीप नरवाल, अजय ठाकूर यासारख्या खेळाडूंना इराणचे बचावपटू आपल्या जाळ्यात अडकवत गेले. पहिल्या सत्राच्या अखेरीस दोन्ही संघ ९-९ अशा बरोबरीत होते.

दुसऱ्या सत्रात इराणच्या खेळाडूंचा आक्रमक पवित्रा पहायला मिळाला. भारताच्या प्रत्येक चढाईपटूला बाद करत इराणचा संघ सामन्यात आघाडी मिळवत गेला. इराणच्या या आक्रमक खेळापुढे भारताचे खेळाडू काहीसे भांबावून गेले. मोनू गोयत, प्रदीप नरवाल यासारख्या खेळाडूंना गुणांची कमाई करता आली नाही. त्यातच फैजल अत्राचली आणि अजय ठाकूरला यांच्यात झालेल्या झटापटीदरम्यान अजय ठाकूर जखमी झाला. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार बाहेर गेल्यामुळे संघाचं मनोधैर्य काहीसं खचलेलं पहायला मिळालं. भारताच्या गोटात पसरलेल्या या अनागोंदीचा फायदा घेत इराणने भारताला पहिल्यांदा सर्वबाद करत मोठी आघाडी घेतली. अखेर २७-१८ च्या फरकाने सामना जिंकत इराणने एशियाडच्या अंतिम फेरीत धडक मारली.

First Published on August 23, 2018 5:33 pm

Web Title: asian games 2018 indonesia indian mens team face a big blow as iran beat them in semi final
टॅग Asian Games 2018
Next Stories
1 झुलन गोस्वामीची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती
2 Asian Games 2018 : अंकिता रैनाला कांस्यपदक, सानिया मिर्झानंतर पदक मिळवणारी दुसरी भारतीय महिला
3 कसोटीत विराट पुन्हा अव्वल स्थानावर, पांड्याचीही भरारी
Just Now!
X