इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई खेळांमध्ये भारती महिला संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात भारतीय महिलांनी चीन चैपेईचा २७-१४ ने पराभव केला. भारतीय महिलांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत पहिल्या सत्राच्या अखेरीस ११-८ अशी आघाडी घेतली होती. भारताकडून पायल चौधरी, रणदीप कौर, साक्षी यांनी चढाईत चांगली कामगिरी केली. बचावात रितू नेगीनेही काही चांगल्या पकडी केल्या. दुसऱ्या सत्रानंतर चीन तैपेईच्या खेळाडूंच्या खेळात काहीशी सुधारणा झालेली पहायला मिळाली. मात्र भारतीय महिलांनी सामन्यावरील आपली पकड काही केल्या ढिली होऊ दिली नाही. अखेरच्या सत्रात भारतीय महिलांनी सामन्यावरील आपली पकड अधिक मजबूत करत चीन तैपेईच्या संघाला बॅकफूटवर ढकलत २७-१४ च्या फरकाने सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.