पुरुषांपाठोपाठ भारतीय महिला कबड्डी संघालाही एशियाडमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे. सुवर्णपदकासाठी झालेल्या सामन्यात इराणच्या महिलांनी भारतीय महिलांचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. इराणने २७-२४ च्या फरकाने हा सामना जिंकला. गुरुवारी झालेल्या सामन्यात इराणच्या पुरुष संघाने भारतावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

अवश्य वाचा – Asian Games 2018 : भारतीय कबड्डी संघाच्या पराभवावर अनुप कुमार म्हणतो…

पुरुषांच्या उपांत्य सामन्यात इराणने भारताला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे इराणविरुद्ध अंतिम सामना खेळताना भारतीय महिला संघावर चांगलचं दडपण होतं. पहिल्या काही मिनीटांमध्ये दोन्ही संघातल्या खेळाडूंनी सावध पवित्रा आजमवलेला पहायला मिळाला. भारतीय संघातल्या चढाईपटूंनी बोनसवर गुण मिळवणं पसंत केलं. यानंतर भारतीय बचावपटूंनी आपल्या खरा रंग दाखवत इराणच्या खेळाडूंच्या उत्कृष्ट पकडी केल्या. या बळावर भारताने ६-२ अशी मोठी आघाडी घेतली. मात्र पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनीटांमध्ये इराणच्या बचावपटूंनी जोरदार पुनरागमन करत पिछाडी कमी केली. पहिल्या सत्राच्या शेवटी भारत १३-११ अशा दोन गुणांनी आघाडीवर होता.

दुसऱ्या सत्रात इराणच्या महिलांनी आपला खेळ आक्रमक केला. भारताच्या सोनाली शिंगटे, साक्षी कुमारी, कविता, पायल चौधरी यासारख्या चढाईपटूंना बाद करत सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात पायल चौधरीने चढाईत काही गुणांची कमाई करत भारताची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला, मात्र इराणने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखत २७-२४ च्या फरकाने सामना जिंकत भारताला आणखी एक धक्का दिला. या विजयासह इराणच्या महिलांनी कबड्डीत सुवर्णपदकाची कमाई केली असून भारतीय महिलांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.