आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय नौकानयनपटूंनी धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. भारताच्या संघाने सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारतीय संघाने ६:१७:१३ अशी आश्वासक वेळ नोंदवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पाचवं सुवर्णपदक ठरलं आहे. भारताच्या दत्तू भोकनळ, स्वर्णसिंह, ओम प्रकाश आणि सुखमित सिंह या चौकडीने भारताला नौकानयनात पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. या संघातील दत्तू हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील आहे. २०१६ रिओ ऑलिम्पिकमधील पदक हुकल्यानंतर दत्तूने त्याची भरपाई करत इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. मात्र दत्तूचा आत्तापर्यंतचा प्रवास खूपच खडतर राहिला आहे.

चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या छोटय़ाशा गावात दत्तूचे बालपण गेले. दहावीच्या उंबरठय़ावर असताना वडिलांचे निधन झाले. लहान वयात कर्तेपणाची जबाबदारी अंगावर आलेल्या दत्तूने मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर लष्करी सेवेत स्थान मिळवले. लष्करी दिनक्रमाचा भाग म्हणून तो बास्केटबॉल खेळत असे. मात्र दत्तूची उंची आणि धडधाकट शरीरयष्टी पाहून वरिष्ठांनी त्याला नौकानयन संघात समाविष्ट केले. ऑलिम्पिक स्पर्धेचा भाग असलेल्या नौकानयन या खेळाबद्दल दत्तूला काहीही माहिती नव्हती. मात्र लष्करामधील शिस्तबद्ध यंत्रणेमुळे तो या खेळात रुळला. तांत्रिक गोष्टी शिकतानाच २०१४ मध्ये त्याने राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. २०१५ साली चीन येथे झालेल्या आशियाई नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दत्तूने सिंगल स्कल प्रकारात रौप्यपदकावर नाव कोरले होते. पुण्यातल्या खडकी येथील बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमधून कारकीर्दीची सुरुवात करणारा दत्तू आता पुण्यातच एआरएन विभागात कार्यरत आहे.

रिओ ऑलिम्पिक दरम्यान दत्तूची आई आजारी होती. अंतिम फेरीच्या आधी दत्तूला ही बातमी समजली होती, त्यामुळे लक्ष विचलीत झालेल्या दत्तूने ऑलिम्पिकमध्ये पुढची फेरी न खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रशिक्षकांनी धीर दिल्यानंतर दत्तू खेळायला तयार झाला. मात्र नियती क्रूर असते असं म्हणतात, अवघ्या ६ सेकंदाच्या फरकाने दत्तू पदकाच्या शर्यतीमधून बाहेर पडला. हातात आलेल्या ऑलिम्पिक पदकावर दत्तूला पाणी सोडावं लागलं.

मध्यंतरीच्या काळात दत्तूच्या आईचं निधन झालं. ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीमुळे दत्तूची देशभरात दखल घेतली गेली, राज्य शासनाने ५ लाखाची आर्थिक मदतही केली. मात्र ६ सेकंदाच्या फरकाने रिओ ऑलिम्पिकमध्ये गमावलेलं ते पदक दत्तूला शांत बसू देत नव्हतं. अखेर मिनी ऑलिम्पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दत्तूने सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करत आपलं कौशल्य सिद्ध केलंय.

२००० पासून रोविंगमध्ये (नौकानयन) ऑलिम्पिकमध्ये भारतीय चांगली कामगिरी करत आहेत. दत्तूने आशियाई क्रीडा स्पर्धेत कमावलेलं सुवर्णपदक हे याचीच प्रचिती देतं. त्यामुळे दत्तू आणि इतर भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहता टोकियो ऑलिम्पिकला या क्रीडा प्रकारात भारत पदकाची कमाई करेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.