आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाला साखळी फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण कोरियाने माजी विजेत्या भारतावर अटीतटीच्या लढाईत २४-२३ अशी मात केली. २०१६ साली अहमदाबाद येथे झालेल्या कबड्डी विश्वचषकातही सलामीच्या सामन्यात कोरियाने भारतावर मात केली, त्यानंतर एशियाडमध्ये कोरियाने आज आपल्या जुन्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.

दक्षिण कोरियाकडून जँग कून ली आणि डाँग जिऑन ली या खेळाडूंनी पहिल्या सत्रापासून आक्रमक खेळ करत आपल्या संघाकडे आघाडी कायम ठेवली. भारताकडून कर्णधार अजय ठाकूर आणि प्रदीप नरवालने कोरियाला जोरदार प्रत्युत्तर देत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोरियाच्या खेळाडूंनी रणनिती आखत भारताच्या संघातील महत्वाच्या खेळाडूंना लक्ष्य केलं. ज्याचा परिणाम पहिल्याच सत्रात उघडपणे दिसायला लागला. मध्यांतरापर्यंत कोरियाने सामन्यात १४-११ अशी आघाडी कायम ठेवली होती.

पहिल्या सत्रात भारतीय बचावपटूंनी कोरियाच्या चढाईपटूंना कमी लेखण्याची चूक केली. मात्र पहिल्या सत्रात पिछाडीवर पडल्यानंतर भारताने दुसऱ्या सत्रात आपल्या खेळाचा वेग वाढवला. मोनू गोयतने एकामागोमाग एक चढाया करत कोरियाच्या बचावफळीत खळबळ माजवली. भारताने दुसऱ्या सत्रातही कोरियाला चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोरियाने सामन्यावरील आपली पकड कायम राखत एका गुणाच्या फरकाने सामन्यात विजय मिळवला.