आशियाई क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिसच्या इतिहासात आजपर्यंतची स्वप्नवत वाटचाल करणाऱ्या भारतीय संघाने बुधवारी आणखी एका पदकाची नोंद केली. भारताची मिश्र दुहेरी जोडी मनिका बत्रा व अचंथा शरथ कमल यांना उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला असला, तरी त्यांनी ऐतिहासिक कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. मंगळवारीच भारताच्या पुरुष संघाने कांस्यपदक मिळवले होते. त्यामुळे तब्बल ६० वर्षांनी भारताला टेबल टेनिसमध्ये पदक मिळाले.

संपूर्ण दिवसात मनिका व शरथ यांना चार सामने खेळावे लागले. त्यापैकी फक्त मलेशियाविरुद्धच भारताने सहज विजय मिळवला. उपांत्य फेरीत चीनच्या यिंगशा सुन व वँग सुन यांच्याविरुद्धसुद्धा भारतीय जोडीने चांगली झुंज दिली, मात्र त्यांना ९-११, ५-११, १३-११, ४-११, ८-११ अशा गुणांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

त्यापूर्वी, उपउपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या ली सँगसू व जेऑन जिही या जोडीला मनिका-शरथ यांनी ११-७, ७-११, ११-८, १०-१२, ११-४ असे नमवले. उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी उत्तर कोरियाच्या चा यो सिम व अ‍ॅन जी साँग यांच्यावर ११-४, १०-१२, ११-६, ६-११, ११-८ अशी मात केली.

मिश्र दुहेरीत महिला खेळाडूची भूमिका फार महत्त्वाची ठरते. किंबहुना बहुतांश वेळा त्यांचाच खेळ सामन्याचा निकाल ठरवते. आशियाईत पदक जिंकण्याचे मी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते, मात्र आता ते साध्य झाले असल्याने मला स्वत:वर विश्वास बसत नाही आहे.    – अचंथा शरथ कमल