हैदराबाद : यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी तयारीसाठी भारतीय बॅडमिंटनपटूंना फारसा वेळ मिळालेला नाही. तरीदेखील भारतीय बॅडमिंटनपटू २०१४च्या आशियाई क्रीडा स्पर्धेपेक्षा अधिक चांगली कामगिरी करतील, असा विश्वास भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केला.

इंचेऑन येथे २०१४ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला केवळ एका कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र यंदा किमान पदकाचा रंग बदलण्यात तरी भारतीय यशस्वी ठरतील, अशी अपेक्षा असल्याचे सिंधूने सांगितले. या स्पर्धेत आम्हाला वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारांमध्ये खेळायचे आहे. त्यामुळे कमी तयारीसह खेळणे तसे अवघडच असते. मात्र माझ्यासह भारतीय खेळाडू चांगल्या बहरात असल्याने आम्ही गतवेळेपेक्षा अधिक चांगली कामगिरी करू शकू, असेही सिंधूने सांगितले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सिंधूला मरीनकडून पराभव पत्करावा लागल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र त्या कामगिरीवर मी समाधानी असल्याचे सिंधूने नमूद केले.

आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला महिलांच्या एकेरी गटात अद्याप एकही पदक मिळालेले नाही. पुरुषांच्या गटात भारताला एकमेव पदक मिळाले होते, ते १९८२ साली दिल्लीत झालेल्या आशियाई स्पर्धेत सय्यद मोदीने पटकावले होते. ती स्पर्धादेखील भारतात घरच्या मैदानावर होती. त्यानंतर तब्बल अडीच दशकांहून अधिक काळ उलटूनदेखील अद्यापदेखील एकाही खेळाडूला वैयक्तिक पदक मिळवणे शक्य झालेले नाही.

‘‘जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने आशियातील ओकुहारा, यामागुची, सुंग जी हुआन यासारख्या एकाहून एक सरस खेळाडूंना सिंधूने पराभूत केले आहे. त्यामुळे  यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सिंधूकडून पदकाची अपेक्षा बाळगण्यास काहीच हरकत नाही,’’ असे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी सांगितले.

कोणतीही भीती नाही

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पराभूत झाल्याने सुवर्णपदक गमावले असा विचार न करता मी रौप्यपदक मिळवले असा विचार करते. सुवर्णपदकाने अधिक आनंद झाला असता हे खरे आहे. मात्र, रौप्यपदक मिळाले म्हणून मी नाराज नसून समाधानी आहे. तसेच अंतिम सामन्याची भीती किंवा दडपण अशी कोणतीही भावना माझ्या मनाला कधीही शिवली नसल्याचेही सिंधुने यावेळी नमूद केले.