Asian Games 2018 : हॉंगकॉंग विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताच्या स्क्वॉश संघाला पराभव स्वीकारावा लागला. पण आधीच्या सामन्यांत चांगली कामगिरी केल्याने भारताला उपांत्य फेरीत पोहोचता आले. हॉंगकॉंग विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताची स्टार स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकल हिच्याकडून अपेक्षा होत्या. पण तिला सामना आपल्या नावे करता आला नाही. पण या पराभवाचे कारण चांगला फॉर्म नसणे हे नव्हते, तर दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात मला चांगली कामगिरी करता आली नाही, असे तिने सांगितले.

‘मी एक सेट जिंकले, पण सामना जिंकणे मला शक्य झाले नाही. कारण दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात मला चांगली कामगिरी करता आली नाही आणि याची मला खंत आहे. शेवटच्या साखळी सामन्यात हाँगकाँगविरुद्ध आमचा खेळ चांगला झाला नाही. आम्ही थोडे कमी पडलो. हाँगकाँगच्या खेळाडूने उत्तम कामगिरी केली, असे मत तिने व्यक्त केले.

जोश्ना चिनाप्पा सरळ सेट्समध्ये पराभूत झाली. ही गोष्ट फार कमी वेळा होते. उपांत्य फेरीमध्ये नक्कीच आम्ही चांगली कामगिरी करू. उपांत्य फेरीत आमचा सामना मलेशियाशी आहे.  मलेशियाचा संघ जरी चांगल्या लयीत असला, तरी त्यांना उपांत्य फेरीत पराभूत करणे हे अशक्य नाही. त्यांना नमवण्यास आम्ही समर्थ आहोत, असेही ती म्हणाली.