13 November 2019

News Flash

Asian Games 2018 : खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल सचिन म्हणतो…

भारताने यंदाच्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक ६९ पदके मिळवली.

सचिन तेंडुलकर

Asian Games 2018 : इंडोनेशियामध्ये सुरु असलेल्या एशियाड स्पर्धांचा आज सांगता समारंभ झाला. या खेळांमध्ये भारताने १४व्या दिवशी २ सुवर्ण पदके कमावत भारतीय चाहत्यांना गोड आठवणी दिल्या. बॉक्सर अमित पांघलने ४९ किलो वजनी गटात, तर प्रणब बर्धन-शिबनाथ सरकार या जोडीने ब्रिज क्रीडा प्रकारच्या पुरुष दुहेरी गटात सुवर्णपदक जिंकले. याशिवाय भारताने दिवसभरात स्क्वॉशमध्ये एका रौप्यपदकाची कमाई केली. तर भारतीय पुरुष हॉकी संघाने भारताला कांस्यपदक जिंकवून दिले आणि भारताची पदकसंख्या ६९वर नेली. एशियाड स्पर्धांच्या इतिहासात भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. या बाबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

भारताने आशियाई स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली. आपल्या क्रीडापटूंनी विक्रमी पदके कमावत इतिहास रचला. ही उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. प्रत्येक खेळाडू, पदक विजेते आणि या स्पर्धांना यशस्वी करणाऱ्या प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो, असे त्याने ट्विट केले आहे.

भारताने यंदाच्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक ६९ पदके मिळवली. या आधी गुआंगझू येथे झालेल्या २०१० सालच्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताला ६५ पदके मिळवण्यात यश आले होते. तर १९८२ साली नवी दिल्लीत झालेल्या स्पर्धांमध्ये भारताने ५७ पदकांची कमाई केली होती. तीच कामगिरी करण्यात भारताला २०१४च्या इंचियॉन आशियाई स्पर्धांमध्ये यश आले होते. याशिवाय, २००६ साली झालेल्या दोहा स्पर्धेत (५३), १९६२ सालच्या जकार्ता स्पर्धांमध्ये (५२) आणि १९५१ सालच्या नवी दिल्लीतील स्पर्धांमध्ये (५१) भारताला पदकांची अर्धशतक गाठता आले होते.

First Published on September 2, 2018 8:24 pm

Web Title: asian games 2018 sachin tendulkar congratulates indian players and medal winners
टॅग Asian Games 2018