आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत सर्वाधिक पदके कमावली. जकार्ता येथे झालेल्या या स्पर्धेत भारताने एकूण ६९ पदकांची कमाई करून आशियाई स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीची नोंदविली. भारताने यंदा सर्वोत्तम सुवर्णपदकांच्या विक्रमाशीही बरोबरी केली. यापैकी स्वप्ना बर्मन हिने हेप्टाथ्लॉन या खेळात भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. आशियाई स्पर्धेत हेप्टाथ्लॉनमध्ये सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली.

स्वप्ना ही अत्यंत गरीब कुटूंबातील आहे. स्वप्ना ही घोश्पारा येथे लहानाची मोठी झाली आहे. स्वप्नाचे वडील रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकत होते. पण अर्धांगवायूचा झटका आल्याने ते अंथरुणाला खिळून आहेत. तसेच, तिची आई चहाच्या मळ्यात काम करते. त्यामुळे तिच्या कामगिरीची दखल घेत आणि तिचे कौतुक करत पश्चिम बंगाल सरकारकडून तिला १० लाखांचं बक्षिस जाहीर करण्यात आले. त्याशिवाय तिला सरकारी नोकरीही देण्याचे आश्वासन देण्यात आले. या दरम्यान तिला देण्यात येणाऱ्या बक्षीसाची रक्कम वाढवावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

ऑलिम्पिक बॉक्सर विजेंदर सिंग याने ही विनंती केली असून ‘मा. ममता बॅनर्जी, स्वप्ना बर्मनला देण्यात येणाऱ्या बक्षीस रकमेत वाढ करावी, ही विनंती’, असे ट्विट त्याने केले. इतर काही ठिकाणी पदक विजेत्या खेळाडूला ३ कोटींपर्यंत इनाम देण्यात आले आहे. अोडिशा सरकारने रौप्यपदक विजेत्या द्युती चंद हिला ३ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे त्याने अन्य राज्यांनी पदकविजेत्या खेळाडूंना जाहीर केलेल्या बक्षीसांच्या रकमांचाही उल्लेख करत याबाबत विनंती केली आहे.

या दरम्यान कुस्तीपटू बबीता फोगट हिने देखील याबाबत विनंती केली आहे.