डाव्या डोळ्याला झालेल्या जखमेची तमा न बाळगता विकास कृष्णनने (७५ किलो) उपांत्य फेरी गाठताना आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग तिसरे पदक निश्चित केले. याचप्रमाणे अमित पांघलने (४९ किलो) उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात वर्चस्वपूर्ण विजय मिळवताना प्रथमच पदकावर दावा केला आहे. मात्र धीरजचे (६४ किलो) आव्हान संपुष्टात आले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत २०१० मध्ये सुवर्ण आणि २०१४ मध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या विकासने चीनच्या टुओहेटा एर्बिके टँगलाटिहानचा ३-२ असा पराभव केला. पहिल्या फेरीत बचावात्मक पवित्रा घेणाऱ्या विकाससाठी हा सामना आव्हानात्मक ठरला. उपांत्य फेरीत त्याचा अबिल्खान अमनकूलशी सामना होणार आहे.

४९ किलो वजनी गटातील अमितने दक्षिण कोरियाच्या किम जँग रायाँगचा ५-० असा पराभव केला. उपांत्य फेरीत त्याची कार्लो पालमशी गाठ पडणार आहे. त्यानंतर मंगोलियाच्या चिनझॉरिग बाटारसुखने उपांत्यपूर्व फेरीत धीरजचा ५-० असा पाडाव केला.

सर्जूबालाचे आव्हान संपुष्टात

जागतिक रौप्यपदक विजेत्या सर्जूबाला देवीचे (५१ किलो) आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्यपूर्व लढतीत चीनच्या युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या चँग युआनने तिचा ५-० असा सहज पराभव केला. २०१० मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला बॉक्सिंगचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर प्रथमच आशियाई स्पर्धेतून भारतीय महिला बॉक्सिंगपटू रिक्त हस्ते परतणार आहेत. २०१४च्या आशियाई स्पर्धेत एम. सी. मेरी कोमने सुवर्ण, तर एल. सरिता देवी आणि पूजा राणी यांनी कांस्यपदकांची कमाई केली होती.