नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत यापूर्वी बॉक्सिंगमध्ये दोन वेळा पदक मिळवले असल्याने यंदा पदकांची हॅट्ट्रिक साधणारा पहिला बॉक्सर होण्याचा मान पटकावण्याची संधी विकास कृष्णनला आहे. मात्र त्या संभाव्य हॅट्ट्रिकचा कोणताही दबाव माझ्यावर येऊ देणार नसल्याचे विकासने सांगितले.

२०१०च्या आशियाईत सुवर्ण, २०१४ साली कांस्य अशी दोन पदकांची कमाई विकासच्या नावावर आहे. १८ ऑगस्टपासून जकार्ता आणि पालेमबांग या इंडोनेशियातील दोन शहरांमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. यापूर्वी भारताच्या हवा सिंग यांनी १९६६ आणि १९७० साली सलग दोन वेळा मोठय़ा वजनी गटात आशियाई पदके पटकावली होती, तर विजेंद्र सिंगने २००६ आणि २०१० अशा दोन वर्षी आशियाई पदके पटकावली होती. त्यानंतर विजेंद्र सिंग हा व्यावसायिक बॉक्सर बनल्याने स्पर्धाच्या िरगणातून तो बाद झाला आहे. मात्र, अद्याप एकाही बॉक्सिंगपटूला सलग तीन आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये पदके पटकावता आलेली नाहीत. यंदाच्या स्पर्धेत पदक पटकावणारी कामगिरी विकासने केल्यास त्याच्या हातून नवीन इतिहास निर्माण होणार आहे. त्याबाबत दबाव जाणवतो का, या प्रश्नाला उत्तर देताना विकास म्हणाला, ‘‘खरे सांगायचे तर नाही. ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मी सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे मी मानसिकदृष्टय़ा अगदी संतुलित अवस्थेत आहे. तसेच शारीरिक तंदुरुस्तीदेखील परिपूर्ण आहे. त्यामुळे आता केवळ पुढील आशियाईवर लक्ष केंद्रित केले असून भविष्यातील योजनांवर त्यानंतरच विचार करणार आहे.