आशियाई खेळांमध्ये भारताच्या वीरधवल खाडेचे ५० मीटर फ्री स्टाइल स्विमींग स्पर्धेतील पदक अवघ्या ०.०१ सेकंदाने (म्हणजेच सेकंदाचा शंभरावा भाग) हुकले. पात्रता फेरीमध्ये स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढणारा वीरधव अंतिम फेरीमध्ये चौथ्या स्थानावर राहिला. वीरधवलने २२.४७ सेकंदांचा वेळ घेतला तर कांस्य पदक जिंकणाऱ्या जपानच्या सुनिची नाकाओने २२.४६ सेकंदात ५० मीटरचे अंतर कापले. चीनच्या यू हेन्सीन याने २२.११ सेकंदाचा वेळ देत सुर्वण तर जपानच्या कात्सुमी नाकामुरा याने २२.२० सेकंदाचा वेळ देत रौप्य पदकावर नाव कोरले.

वीरधवलने पात्रता फेरीमध्ये २२.४३ सेकंदांचा वेळ घेत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र अगदी सेकंदाच्या शंभराव्या भागा इतक्या अल्पश्या वेळेच्या फरकाने वीरधवलचे आशियाई खेळांमधील दुसरे पदक हुकले. याआधी त्याने गुआंझाऊ येथे २०१० साली झालेल्या स्पर्धांमध्ये कांस्य पदक पटकावले होते.

पदक अवघ्या ०.०१ सेकंदाने (म्हणजेच सेकंदाचा शंभरावा भाग) हुकले

सकाळी झालेल्या पात्रता फेरीत वीरधवलने भन्नाट कामगिरी करताना स्वत:चा २२.५२ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रमाला ०.०९ सेकंदांने मागे टाकत नवीन विक्रम प्रस्थापित केला. २००९ साली ऑगस्टमध्ये आशियाई स्वीमिंग चॅम्पिनशिप स्पर्धेत त्यांने हा राष्ट्रीय विक्रम केला होता. आज ९ वर्षांनंतर त्याने तो विक्रम मोडला. राष्ट्रीय विक्रम मोडण्यात यशस्वी झालेला वीरधवल पात्रता फेरीमध्ये २२.४३ सेकंदांचा वेळ देऊनही तिसऱ्या स्थानी राहिला. चिनच्या हिन यू (२२.२१ सेकंद) आणि हाँगकाँगचा केथन किंग हीम (२२.३८ सेकंद) हे दोघे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहिले होते.

अनेकांनी वीरधवलचे पदक इतक्या छोट्या फरकाने हुकल्याने ट्विटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या.

कित्ती वाईट…

…तरी तुझा आम्हाला अभिमान आहे

पात्रता फेरीमध्ये राष्ट्रीय विक्रम मोडल्यानंतर पीटीआयशी बोलताना वीरधवलने मी जानेवारी महिन्यापासून बंगळुरुमध्ये माझ्या प्रशिक्षकांच्या मदतीने मेहनत घेत आहे त्याचेच हे फळ असल्याचे म्हटले. मी प्रत्येक स्पर्धेमध्ये आधीपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. स्पर्धामध्ये भाग घेतल्याने कामगिरी सुधारण्यास मला मदत झाल्याचे वीरधवलने सांगितले. दहा वर्षांनंतर मी एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी झालो आहे. मी कॉमनवेल्थ गेम्समध्येही भाग घेतलेला. मात्र तिथे मी चांगली कामगिरी करु शकलो नव्हतो अशी खंतही त्याने व्यक्त केली होती.