१८ ऑगस्टपासून इंडोनेशियात सुरु होणाऱ्या आशियाई खेळांमध्ये भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाची कमाई करेल असा आत्मविश्वास, भारतीय संघाचा कर्णधार पी.आर.श्रीजेशने व्यक्त केला आहे. आशियाई स्पर्धेत विजेतेपद मिळवून भारतीय संघ २०२० टोकीयो ऑलिम्पीकसाठी पात्र होण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचंही श्रीजेश म्हणाला. नुकत्याच नेदरलँड येथे झालेल्या मानाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताला उप-विजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतावर पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ अशी मात केली होती.

“आशियाई स्पर्धेचं विजेतेपद मिळवून ऑलिम्पिक खेळांसाठी पात्र होणं हे सध्या आमच्या पुढचं प्रमुख उद्दीष्ट आहे. सध्याचा संघ पाहता आम्ही २०२० टोकीयो ऑलिम्पीकसाठी पात्र ठरु असा विश्वास मला आहे. आशियाई स्पर्धेतही आमचा संघ सुवर्णपदकाचा दावेदार असेल.” पीटीआयशी बोलत असताना श्रीजेशने आपलं मत व्यक्त केलं.

सध्या भारतीय हॉकी संघ पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात अपयशी ठरतो आहे. आशियाई खेळांमध्ये आपला हाच कमजोर दुवा आपल्यावर भारी पडू नये यासाठी भारतीय संघ सध्या कसून सराव करतो आहे. याचसोबत आशियाई स्पर्धांचं विजेतेपद मिळवल्यास, वर्षाअखेरीस भारतात पार पडणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठीही भारतीय संघाला चांगला आत्मविश्वास मिळेल, असं संघाचे प्रशिक्षक हरेंद्रसिंह म्हणाले.