Asian Games 2018 : पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेली भारताची वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आगामी आशियाई स्पर्धेतुन माघार घेतली आहे. पाठीच्या दुखण्यातून पूर्णपणे न सावरल्यामुळे तिने हा निर्णय घेतला आहे. तिला या स्पर्धांना मुकावे लागू शकते, अशी शक्यता भारताचे प्रमुख प्रशिक्षक विजय शर्मा यांनी वर्तवली होती. त्यानंतर मंगळवारी मीराबाई चानू हिने आशियाई स्पर्धांतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे सचिव सहदेव यादव यांनी याबाबत माहिती दिली.

टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेला पात्र ठरण्याचे लक्ष्य बाळगल्यामुळे या स्पर्धांतून माघार घेण्याचा विचार ती करत असल्याचे सांगितले जात होते. मे महिन्यापासून मीराबाई चानू ही पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. ती अद्याप यातून सावरलेली नाही. वेटलिफ्टिंग फेडरेशनला याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला आहे. आता तिच्याबाबतचा निर्णय हा फेडरेशनच घेईल, असे प्रशिक्षक विजय शर्मा यांनी काल स्पष्ट केले. आशियाई स्पर्धेला काही दिवसच शिल्लक आहेत. अशा स्थितीत पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या मीराबाईने जड वजन उचलणे योग्य नाही. त्याचा परिणाम तिच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेवर होऊ शकतो आणि अखेर आशियाई स्पर्धांपेक्षा ऑलिम्पिक स्पर्धा अधिक महत्त्वाची आहे’, असेही शर्मा म्हणाले.

नोव्हेंबरमध्ये अश्गाबात येथे वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा होत आहेत. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची ही पहिलीच स्पर्धा असणार आहे.