|| राजू भावसार

भारतीय संघाच्या इराणकडून पत्करलेल्या पराभवाचे विश्लेषण केले तर आपण रणनीतीमध्ये कमी पडलो, असे म्हणता येईल. एवढय़ा वर्षांचा अनुभव भारताच्या गाठीशी होता. आपणच अन्य देशांना कबड्डीचे धडे दिले; परंतु रणनीती कशी असावी हेच उपांत्य फेरीत भारताला कळले नाही. साखळीत दक्षिण कोरियाने आणि आता इराणने भारताला हे दाखवून दिले. प्रतिस्पर्धी संघांनी गुणफलक फारसा वाढू न देता भारतावर दडपण ठेवले. इराणने अव्वल पकडींच्या (सुपर टॅकल) बळावर आपले वर्चस्व सिद्ध केले.

इराणची आक्रमणाची बाजू कमकुवत आहे. त्यामुळे भारतीय संघाने बचावावर भर देण्याऐवजी अधिक चढाईपटूंना संधी दिली. उजवा आणि डावा मध्यरक्षक या स्थानावर आपण अष्टपैलू खेळाडूंचा वापर करणे अधिक पसंत केले. त्यामुळे भारताचा बचाव प्रभावी ठरू शकला नाही. भारताच्या आक्रमणाबाबत सांगायचे तर चढाईपटूंचा योग्य वापर आपल्याला करता आला नाही. प्रो कबड्डी लीगमध्ये अजय ठाकूर, राहुल चौधरी, रोहित कुमार यांनी आपल्या एकटय़ाच्या बळावर सामने जिंकलेले दिसून आलेले आहे. मात्र इथे ते चित्र पाहायला मिळाले नाही. एखाद्या चढाईपटूला चार वेळा पाठवायचे आणि न चालल्यास दुसऱ्याला पाठवून पाहायचे, ही सामन्यातील रणनीती योग्य वाटली नाही. भारताच्या याच चढाईपटूंनी प्रो कबड्डीत इराणी बचाव भेदत सामने जिंकून दिले आहेत. मागच्या वर्षी प्रो कबड्डीच्या अंतिम फेरीत पाटणा पायरेट्सच्या प्रदीप नरवाल आणि मनू गोयत यांनी गुजरात फॉच्र्युनजायंट्सकडून खेळणाऱ्या इराणच्या याच दोन कोपरारक्षकांना प्रभाव पाडू दिला नव्हता. त्या वेळी गुजरातचे डावे आणि उजवे मध्यरक्षक यापेक्षा अधिक चांगले होते.

रिशांक देवाडिगाला आतापर्यंतच्या वाटचालीत फारशी संधी देण्यात आली नव्हती. उपांत्य फेरीत मात्र त्याला संपूर्ण सामन्यात खेळवले. भारतीय संघ हा आक्रमण हे बलस्थान मानून खेळला, तर किमान ती महत्त्वाची हत्यारे कशी वापरावीत हेच समजत नसेल, तर काय अर्थ आहे. त्यामुळे खेळाडूंपेक्षा या पराभवाला संघ व्यवस्थापन जबाबदार आहे. रिशांकचे तंत्र म्हणजे बोनससाठी प्रयत्न करायचा आणि पुढे सरसावणाऱ्या बचावाला भेदत धडकेने मध्यरेषा गाठणे. फझल अत्राचालीसारखा कोपरारक्षक समोर असेल, तर रिशांकला त्याला भेदणे अवघड ठरते. भारताला सुवर्णपदक जिंकून द्यायचे असेल, तर रिशांकपेक्षा तंत्राने अधिक सरस अशा राहुल चौधरीला सामन्यात अधिक संधी देण्याची आवश्यकता होती. इतक्या अनुभवी खेळाडूंनी सामन्यानुसार रणनीतीत बदल करायला हवा होता.

मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणकडून भारताने सुवर्णपदक हिसकावून घेतले होते. राकेश कुमारच्या अनुभवाच्या बळावर भारताला ते शक्य झाले होते. आताच्या संघात सध्याचे सर्वच फॉर्मात असलेले खेळाडू होते. पण अनुप कुमारसारखा एखादा अनुभवी खेळाडू संघात हवा होता. अजय चांगला खेळाडू आहे, परंतु त्याचे नेतृत्वाचे गुण अद्याप दिसून आलेले नाहीत.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत हरला, परंतु कबड्डी हा खेळ जिंकला, असे म्हणायला हरकत नाही. एक दिवस असा येईल की, कबड्डीमध्ये भारताला आव्हान निर्माण होतील, असे गेली अनेक वष्रे म्हटले जायचे. पण हे इतक्या लवकर होईल, असे वाटले नव्हते.

(लेखक हे अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू आहेत.)