चंडीगढ : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारे ज्येष्ठ धावपटू हकम सिंग यांचे अल्पशा आजाराने संगरुर (पंजाब) येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते ६४ वर्षांचे होते.

हकम सिंग यांनी १९७८मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतील २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यांना मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी सेनादलातील शीख रेजिमेंटमध्ये हवालदार म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

किडनी व आतडय़ाच्या आजारामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील उपचारासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धनसिंह राठोड यांनी १० लाख रुपयांची, तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पाच लाख रुपयांची मदत केली होती.