आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा

 मस्कत : गतविजेत्या भारताने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचे तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी कंबर कसली आहे. विजयाची परंपरा अखंडपणे ठेवत भारताने अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत मजल मारली आहे. आता शनिवारी रंगणाऱ्या उपांत्य फेरीत भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जपानवर वर्चस्व गाजविण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

साखळी फेरीत जपानचा ९-० असा धुव्वा उडवल्यामुळे या सामन्यात विजयासाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे. साखळी फेरीत भारत हा एकही हार न पत्करलेला एकमेव संघ आहे. भारताने सर्व सामने जिंकले असून फक्त मलेशियाविरुद्ध गोलशून्य बरोबरी पत्करली होती. भारताने १३ गुणांसह अव्वल स्थान तर जपानने सात गुणांसह चौथे स्थान पटकावले होते. पाकिस्तान आणि मलेशियाने १० गुण प्राप्त केले होते, मात्र पाकिस्तानने गोलफरकासह दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली.

भुवनेश्वर येथे होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेआधीची ही अखेरची स्पर्धा असल्यामुळे टीकाकारांना चोख उत्तर देण्यासाठी तसेच आत्मविश्वास उंचावण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. भारताच्या कामगिरीवर नजर टाकली तर गतविजेत्यांनी आतापर्यंत पूर्णपणे हुकमत गाजवली आहे. हरेंद्र सिंग यांच्या प्रशिक्षकपदाखालील भारताने ओमानचा ११-०, पाकिस्तानचा ३-१, जपानचा ९-० आणि दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव केला आहे. आता आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या कामगिरीवर पडदा टाकण्यासाठी भारत उत्सुक आहे.

भारताचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी सांगितले की, ‘‘आमच्यासाठी हा पूर्णपणे नवा सामना असणार आहे. भारतीय संघाने भावनांवर नियंत्रण ठेवून आक्रमक हॉकीचे प्रदर्शन केलेले मला नक्कीच आवडेल. उपांत्य फेरीची लढत ही नेहमीच प्रतिष्ठेची असल्यामुळे जपानविरुद्धच्या आधीच्या निकालाला कोणतेही महत्त्व राहात नाही.’’ जपानने या स्पर्धेसाठी सहा युवा खेळाडूंना संधी दिली आहे.

* सामन्याची वेळ : रात्री ९:१० वाजल्यापासून

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २.