इराणच्या गोरगान शहरात सुरु असलेल्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघाने दक्षिण कोरियावर ४५-२९ अशी मात केली. अंतिम फेरीत भारताची गाठ पाकिस्तान विरुद्ध इराण यांच्यातील विजेत्या संघाशी पडणार आहे. अहमदाबाद येथे झालेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच सामन्यात कोरियाने भारतावर मात केली होती. त्यामुळे उपांत्य सामन्यात भारताला कडवी झुंज मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र प्रत्यक्ष सामन्यात भारताने कोरियाला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही.

अवश्य वाचा – आशियाई कबड्डी अजिंक्यपद २०१७ – भारताची पाकिस्तानवर मात, गटात भारत अव्वल

उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी भारतीय संघाने संदीप नरवालला विश्रांती देत उजवा कोपरारक्षक मोहित छिल्लरला संघात जागा दिली. तर चढाईची जबाबदारी अजय ठाकूर, मणिंदर सिंह आणि प्रदीप नरवाल यांनी सांभाळली. सुरुवातीला दोनही संघांनी फारसा धोका न पत्करता अंतिम चढाईवर गुण मिळवण्याकडे प्राधान्य दिलं. यामुळेच सामन्यात एका क्षणापर्यंत भारताकडे ५-४ अशी नाममात्र एका गुणाची आघाडी होती. मात्र मणिंदर सिंह आणि कर्णधार अजय ठाकूरच्या ‘सुपर रेड’मुळे भारताने सामन्यात मोठी आघाडी घेतली.

अवश्य वाचा – आशियाई कबड्डी अजिंक्यपद २०१७ – भारताची जपानवर मात, सलग तिसऱ्या विजयाची नोंद

दुसऱ्या सत्रात भारतीयांनी आपल्या खेळाची गती वाढवत कोरियाला बॅकफूटलला ढकललं. चढाई आणि बचाव अशा दोनही क्षेत्रात भारताने कोरियावर कुरघोडी केली. या सामन्याआधी भारताने साखळी फेरीत इराक, अफगाणिस्तान, जपान आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तावर मात केली होती. त्यामुळे अंतिम फेरीत भारत आपला विजयी फॉर्म कायम राखत विजेतेपद मिळवतो का याकडे सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे.

अवश्य वाचा – आशियाई कबड्डी अजिंक्यपद २०१७ – कबड्डीच्या मैदानात भारताचं शतक, अफगाणिस्तानचा १०३-२५ च्या फरकाने धुव्वा