News Flash

आशियाई अजिंक्यपद कबड्डी – इराणध्ये भारताचा दबदबा, अंतिम फेरीत भारताचे संघ विजयी

भारतीय पुरुषांचा संघ स्पर्धेत अजिंक्य

अंतिम फेरीत पाकिस्तानला धूळ चारणारा भारताचा कबड्डी संघ

इराणच्या गोरगान शहरात सुरु असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आपला दबदबा कायम ठेवला आहे. पुरुष संघाने अंतिम फेरीत आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ३६-२२ अशी मात केली. एकाच स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सलग दुसऱ्यांचा पराभव केला आहे. याआधी झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला ४४-१८ अशी धुळ चारली होती. मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने यजमान इराणचं आव्हान अटीतटीच्या लढतीत मोडून काढत, अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र भारतीय संघापुढे पाकिस्तानची डाळ शिजली नाही.

४० मिनीटांच्या या सामन्यात बहुतांश काळ भारताने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. चढाई आणि बचावात अजय ठाकूरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पाकिस्तानला सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. अंतिम फेरीसाठी भारतीय संघाने मोहीत छिल्लरऐवजी अष्टपैलू संदीप नरवालला पुन्हा संघात जागा दिली. ज्याचा फायदा भारताला सामन्यात झालेला पहायला मिळाला.

मध्यांतरापर्यंत भारतीय संघाने सामन्यात २५-१० अशी आघाडी घेतली होती. मध्यांतरानंतर कोपरारक्षक सुरिंदर नाडाने दोन सुरेख अँकल होल्ड करत पाकिस्तानला आणखी धक्के दिले. भारताच्या या झंजावाती खेळापुढे पाकिस्तानचा संघ सावरुच शकला नाही. अखेर अंतिम फेरीतही पाकिस्तानवर मात करत भारतीय संघाने स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावे केलं.

अभिलाषा म्हात्रेच्या भारतीय संघाने महिलांच्या अंतिम सामन्यात बाजी मारत जेतेपद पटकावलं

दुसरीकडे अभिलाषा म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघानेही अंतिम फेरीत दक्षिण कोरियावर मात करत विजेतेपदावर मोहोर उमटवली. ४२-२० च्या फरकाने भारतीय महिला संघाने हा सामना आपल्या नावावर केला. अंतिम फेरीत भारतीय महिला संघाला फारसा प्रतिकार झाला नाही. सायली जाधव, साक्षी कुमारी, कविता, पायल चौधरी, प्रियांका, रणदीप कौर आणि कर्णधार अभिलाषा म्हात्रे या भारतीय संघाने कोरियाच्या संघावर लिलया मात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2017 8:27 pm

Web Title: asian kabaddi championship 2017 gorgan iran indian men beat their arch rival pakistan in final match and claim the title womans team beat south korea in final match
टॅग : India Vs Pakistan
Next Stories
1 हाँगकाँग ओपन सुपरसिरीज – पी. व्ही. सिंधूचा अंतिम फेरीत पराभव
2 आशियाई कबड्डी अजिंक्यपद २०१७ – भारत अंतिम फेरीत दाखल, दक्षिण कोरियावर ४५-२९ ने केली मात
3 Video: धोनीने मला स्लेजिंग करण्यास भाग पाडलं – सुरेश रैना
Just Now!
X