आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने इतिहासाची नोंद केली आहे. इराणच्या गोरगान शहरात सुरु असलेल्या स्पर्धेत, भारताने दुसऱ्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाचा १०३-२५ असा धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत आपली जागाही निश्चीत केली आहे.

अवश्य वाचा – आशियाई कबड्डी अजिंक्यपद २०१७ – भारताकडून इराकचा धुव्वा

भारतीय संघापुढे अफगाणिस्तानचा संघ हा एखाद्या नवशिक्या खेळाडूंचा संघ भासत होता. यामुळे संपूर्ण सामना हा कमालीचा एकतर्फी झालेला पहायला मिळाला. या सामन्यानंतर भारतीय संघाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे दक्षिण कोरियानेही थायलंडवर ५२-३४ अशी मात केली. कोरियाकडून प्रो-कबड्डीचं मैदान गाजवणाऱ्या जँग कून ली, डाँग जिओन ली यांनी आश्वासक खेळ केला.

काल झालेल्या पहिल्या साखळी सामन्यात भारताने इराकचा ६१-२१ असा पराभव केला. प्रो-कबड्डीत सर्वाधीक गुणांची कमाई करणाऱ्या प्रदीप नरवालने कालच्या सामन्यातही चढाईत सर्वाधीक गुणांची कमाई केली. तर बचावात सुरजित सिंहने ५ गुण मिळवले. तर नितीन तोमरनेही पहिल्या सामन्यात चढाई आणि बचावात मिळून ६ गुणांची कमाई केली.