नोव्हेंबर २३ ते २६ दरम्यान इराणच्या गोरगान शहरात पार पडणाऱ्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. पुरुष संघाची जबाबदारी अजय ठाकूरकडे सोपवण्यात आलेली असून महिलांच्या संघाची जबाबदारी महाराष्ट्राच्या अभिलाषा म्हात्रेकडे सोपवण्यात आलेली आहे. महिलांच्या संघात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपली जागा कायम राखली असली, तर पुरुषांच्या संघात महाराष्ट्राचे खेळाडू स्थान पटकावू शकलेले नाहीयेत.

अवश्य वाचा – कबड्डीपटू निलेश शिंदे अटकेत, स्थानिक कबड्डी सामन्यात मारहाण केल्याचा आरोप

पुरुषांच्या संभाव्य संघात महाराष्ट्राच्या काशिलींग अडके, सचिन शिंगाडे आणि रिशांक देवाडीगा या ३ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. मात्र या तिघांपैकी एकाही खेळाडूला अंतिम संघात स्थान मिळवता आलेलं नाहीये. पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी रामबीर सिंह खोकर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, तर महिला संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सुश्री बनाई साहा यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे.

इराणमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी अनुप कुमार, मनजीत छिल्लर, धर्मराज चेरलाथन, विशाल माने आणि गिरीश ऐर्नेक यासारख्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. या खेळाडूंऐवजी यंदाच्या संघात तरुण खेळाडूंना जागा देण्यात आली आहे. २२ नोव्हेंबररोजी भारताचा संघ इराणसाठी रवाना होणार आहे.

अवश्य वाचा – तब्बल २६ कोटी लोकांनी पाहिला ‘तो’ सामना

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी असा असेल भारताचा पुरुष संघ –

अजय ठाकूर (कर्णधार), दिपक निवास हुडा, महेंद्रसिंह ढाका, मणिंदर सिंह, मोहीत छिल्लर, नितीन तोमर, प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, रोहीत कुमार, सचिन, संदीप नरवाल, सुरींदर नाडा, सुरजीत, विशाल भारद्वाज

असा आहे भारताचा महिलांचा संघ –

अभिलाषा म्हात्रे (कर्णधार), कांचनज्योती दीक्षित, कविता, मनप्रीत कौर, मारिया मोनिका, पायल चौधरी, प्रियांका, प्रियांका नेगी, रणदीप कौर खेरा, रितु, साक्षी कुमारी, सायली जाधव, शमा परवीन, सोनिया