भारताची अनुभवी जोडी शरथ कमल आणि मनिका बात्रा यांनी शनिवारी ऐतिहासिक कामगिरीची नोंद करताना टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटाची पात्रता मिळवली. आशियाई ऑलिम्पिक पात्रता टेबल टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकून शरथ-मनिका यांनी हा पराक्रम केला. ऑलिम्पिकच्या मिश्र दुहेरीसाठी पात्र ठरणारी ही पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे. शरथ-मनिका दोघेही अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरी विभागातून ऑलिम्पिकसाठी पात्र झाले आहेत. परंतु शनिवारी मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पहिले दोन सेट गमावूनसुद्धा त्यांनी कोरियाच्या संग सू ली आणि आणि झि जेऑन यांना ४-२ (८-११, ६-११, ११-५, ११-६, १३-११, ११-८) अशी धूळ चारली.

शरथ-मनिकाच्या यशामुळे आता २३ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय टेबल टेनिसपटूंनी पाचवे स्थान पक्के केले. जी. साथियान आणि सुतिर्था मुखर्जी यांनीही एकेरीतील ऑलिम्पिकमधील आपले स्थान निश्चित केले आहे. या स्पर्धेद्वारे भारताचे चार टेबल टेनिस खेळाडू जुलैमध्ये रंगणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.