१० मीटर एअर रायफल गटातील चारही सुवर्णपदकांना गवसणी

भारतीय नेमबाजांनी १० मीटर एअर रायफल गटातील चारही सुवर्णपदकांना गवसणी घालत भारताच्या सुवर्णपदकांच्या संख्येला १२पर्यंत पोहोचवले आहे. तैपेईच्या तायुअन येथे सुरू असलेल्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत भारताने आतापर्यंत झालेल्या स्पर्धेतील १४ पैकी १२ प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.

रविवारी पाचव्या दिवशी भारताच्या दिव्यांशू सिंह पनवार आणि एलव्हेनिल व्हॅलारिवान यांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या गटात सुवर्णपदकांची कमाई केली. दिव्यांशूने २४९.७ गुणांसह सुवर्ण तर किमने २४७.४ गुणांसह रौप्य आणि शिनने २२५.५ गुणांसह कांस्यपदकांची कमाई केली.

महिलांच्या गटात एलाव्हेनिलने २५०.५ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले, तर तैपेई लिन यिंग शिनने २५०.२ गुणांसह रौप्य आणि कोरियाच्या पार्क सनमिनने २२९.१ गुणांसह कांस्यपदक मिळवले. पुरुषांच्या सांघिक प्रकारात दिव्यांशू, रवी कुमार आणि दीपक कुमार यांनी १८८०.७ गुणांसह सुवर्णपदक मिळवले. कोरियाच्या संघाने १८६२.३ गुणांसह रौप्यपदक पटकावले.

महिलांच्या सांघिक प्रकारात एलाव्हेनिल, अपूर्वी चंडेला आणि मेघना सज्जानारने १८७८.६ गुणांसह सुवर्ण तर तैपेईच्या संघाने १८७२.५ गुणांसह रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेची सोमवारी सांगता होणार असून अखेरच्या दिवशी कनिष्ठ गटात १० मीटर एअर रायफल प्रकाराचे सामने होणार असून त्यातदेखील भारताला पदकांची अपेक्षा आहे.