15 October 2019

News Flash

मिराबाईचे कांस्यपदक तांत्रिक नियमांमुळे हुकले

तांत्रिक नियमांचा फटका बसल्याने तिला कांस्य पदकापासून वंचित राहावे लागले.

मिराबाईने यंदाच्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेतील ४९ किलो वजनी गटात तिची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी बजावली. तसेच कांस्यपदक विजेत्या खेळाडूइतकेच १९९ किलो वजनदेखील उचलले. मात्र तांत्रिक नियमांचा फटका बसल्याने तिला कांस्य पदकापासून वंचित राहावे लागले.

मिराबाईने तिच्या याआधीच्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा (१९२ किलो) तब्बल ७ किलो अधिक वजन या स्पर्धेत उचलले. त्यात ८६ किलो स्नॅच आणि ११३ किलो क्लिन अँड जर्क असे एकूण १९९ किलो वजन उचलले. चीनच्या झँग रोंगनेदेखील १९९ किलो वजन उचलले. त्यात ८८ किलो स्नॅच आणि १११ किलो क्लिन अँड जर्क प्रकारातील होते. मात्र २०१७पासून झालेल्या नियमांनुसार जेव्हा अशी समसमान स्थिती येते, त्यावेळी ज्या खेळाडूने क्लिन अ‍ॅंड जर्कमध्ये कमी वजन आणि स्नॅचमध्ये अधिक वजन उचलले असेल त्याला पदक देण्याचा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे चीनच्या झँगला कांस्यपदक तर मिराबाईला चौथा क्रमांक मिळाला.

पण आशियाई स्पर्धामध्ये क्लिन अँड जर्क प्रकारात अधिक वजन उचलणाऱ्याला पदक देण्याची पद्धत असल्याने मिराबाईला या वर्गातील कांस्यपदक देण्यात आले. ऑलिम्पिकमध्ये केवळ एकूण गुणसंख्येआधारे अव्वल असणाऱ्यांनाच पदक देण्याची परंपरा आहे. ४९ किलोच्या या वजनी गटात २०८ किलो वजन उचललेल्या चीनच्याच होऊ झिहुइला सुवर्णपदक तर उत्तर कोरियाच्या रि सोंग गम हिला २०० किलो वजनासाठी रौप्यपदक प्रदान करण्यात आले.

First Published on April 22, 2019 1:42 am

Web Title: asian weightlifting competition 2