झियान (चीन) : भारताच्या दिव्या काकरान आणि मंजू कुमारी यांनी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या गटात भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती दिव्या हिने ६८ किलो वजनी गटाच्या ‘प्ले-ऑफ’ फेरीत मोंगोलियाच्या बॅटसेटसेग सोरोंझोनबोल्ड हिला हरवत कांस्यपदकावर नाव कोरले. त्यानंतर मंजू कुमारीने व्हिएतनामच्या थी हुआँग डाओ हिला ११-२ असे पराभूत करत गुरुवारी भारताच्या खात्यात दुसऱ्या कांस्यपदकाची भर घातली.

दिव्या आणि मंजू यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे कांस्यपदकासाठीच्या फेरीत खेळण्याची संधी मिळाली. २०१७ मध्ये आशियाई स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या दिव्याला उपांत्य फेरीत चीनच्या फेंग झोऊ हिच्याकडून ४-१४ असा पराभव पत्करावा लागला. त्याआधी उपांत्यपूर्व फेरीत दिव्याने व्हिएतनामच्या हाँग थुय गुयेन हिला १०-० असे हरवले होते. गुडघ्याच्या दुखापतीनंतर पुन्हा एकदा पुनरागमन करणाऱ्या दिव्यासाठी कांस्यपदक विशेष मानले जात आहे.

५९ किलो गटात, मंडू हिला उपांत्य फेरीत मोंगोलियाच्या बॅटसेटसेग अल्टान्टसेटसेग हिच्याकडून ६-१५ अशी हार पत्करावी लागली होती. त्याआधी मंजूने कझाकस्तानच्या मॅडिना बाकबेरजिनोव्हा हिच्याविरुद्धची उपांत्यपूर्व फेरीची लढत ५-३ अशी जिंकली होती.

दरम्यान, ५० किलो गटात, सीमा हिला पात्रता फेरीच्या लढतीत जपानच्या युकी आयरी हिच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. मात्र जपानच्या खेळाडूने अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे सीमाला रिपिचेज फेरीत खेळण्याची संधी मिळाली. रिपिचेज फेरीत सीमाने चायनीज तैपेईच्या मेंग सुआन साय हिला १०-२ असे पराभूत केले. मात्र कांस्यपदकासाठीच्या लढतीत तिला कझाकस्तानच्या व्हॅलेंटिना इव्हानोव्हा इस्लामोव्हा ब्रिक हिच्याकडून ५-११ असा पराभव स्वीकारावा लागल्याने सीमाचे कांस्यपदक पटकावण्याचे स्वप्न भंगले.