रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक आणि आशियाई क्रीडा स्पध्रेतील विजेत्या विनेश फोगटला आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय महिलांना या स्पध्रेत एकही सुवर्णपदक जिंकता आले नाही.

साक्षीला ६२ किलो वजनी गटामध्ये उपांत्यपूर्व सामन्यात पराभव पत्करावा लागला, परंतु कांस्यपदकाच्या ‘प्ले-ऑफ’ सामन्यात साक्षीने उत्तर कोरियाच्या ह्य़ोन ग्याँग मूनला नमवून कांस्यपदक पटकावले. स्पर्धेच्या प्रारंभी साक्षीने व्हिएतनामच्या थाय माय हॅन्ह नग्युएनला पराभूत करीत आगेकूच केली. मात्र दुसऱ्या फेरीत जपानच्या युकाको कावाईकडून तिला पराभव पत्करावा लागला. मात्र कावाई अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्याने साक्षीला रेपिचेजमध्ये पुन्हा संधी मिळाली. ‘रेपिचेज’ फेरीत साक्षीने तांत्रिक गुणांआधारे जिआई चोयवर मात केली. या स्पर्धेपूर्वी विनेशने ५० किलो वजनी गटात जकार्ता एशियाडमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. मात्र, ऑलिम्पिकच्या दृष्टीने कुस्तीसाठी नवीन वजनी गट निश्चित केल्यामुळे तिने ५३ किलो गट निवडला.