महाराष्ट्राला यंदाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेतील पहिले पदक राहुल आवारेच्या रूपाने मिळाले. ६१ किलो वजनी गटात राहुलने कांस्यपदकाची कमाई करत आपल्या खात्यात आणखी एका आंतरराष्ट्रीय पदकाची भर घातली.

स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी मात्र भारताला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. ७४ किलो वजनी गटात सुशील कुमारचा प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जाणारा जितेंदर कुमार याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जितेंदरचे सुवर्ण हुकले असले तरी अंतिम फेरी गाठल्याने त्याचे किर्गिजिस्तान येथे होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी भारतीय संघातील स्थान निश्चित झाले.

दिवसभरातील तिसरे पदक ८६ किलो वजनी गटातून अनुभवी कुस्तीपटू दीपक पुनियाने कांस्यपदकाच्या रूपाने मिळवले. महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारे याने कांस्यपदकासाठीच्या लढतीत इराणच्या माजित अल्मास दास्तान याचा ५-२ पराभव केला. मात्र उपांत्य फेरीच्या लढतीत अतिआत्मविश्वास राहुलला नडला. कारण पंचांच्या निर्णयाला काही वेळा राहुलने दिलेले आव्हान त्याला महागात पडले. चुकीचे आव्हान दिल्याने राहुलचे गुण कमी झाले. परिणामी उपांत्य फेरीत राहुल याला किर्गिजिस्तानच्या उलूबेक झोडोशबेकोवकडून ३-५ असा पराभव पत्करावा लागला.

सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत जितेंदरला कझाकस्तानचा गतविजेता डॅनियार कायसॅनोवकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला. मात्र अंतिम फेरी गाठल्याने जितेंदर किर्गिजिस्तान येथील बिशकेक येथे होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता फेरी स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. परिणामी दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता असलेल्या सुशील कुमारच्या ऑलिम्पिक पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तत्पूर्वी, अंतिम फेरी गाठताना जितेंदरने इराणच्या मुस्तफा होसेनखानीला २-२ आणि मंगोलियाच्या सुमियाबाजार झँडनबुडला २-१ असे नमवले.

अन्य भारतीयांमध्ये, जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता दीपक पुनियाचा ८६ किलो गटाच्या उपांत्य फेरीत पराभव झाला. मात्र कांस्यपदकासाठीच्या लढतीत मात्र दीपकने कामगिरी उंचावली. त्याने अल ओबाईडीचा १०-० फरकाने दणदणीत पराभव केला.

भारताला एकूण २० पदके :

भारताने या स्पर्धेत एकूण २० पदकांची कमाई केली. त्यात पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि ९ कांस्यपदकांचा समावेश आहे. मात्र स्पर्धेत भारताला तिसरे स्थान मिळाले. कारण जपानने सर्वाधिक आठ सुवर्णपदकांसह अव्वल स्थान पटकावले. त्याखालोखाल इराणने सात सुवर्णपदकांसह दुसरे स्थान मिळवले.

अखेरच्या क्षणाला दास्तानला खेचण्याचा प्रयत्न केला होता पण तो योग्यप्रकारे जमला नाही. अन्यथा मला सुवर्णपदक मिळाले असते. माझ्या खेळात सुधारणा दिसत आहे. रौप्यपदक माझ्यासाठी विशेष आहे. ऑलिम्पिक पात्रतेसाठी आता भरपूर मेहनत घेणार.

– जितेंदर कुमार