लॉर्ड्समधील २०१० सालच्या कसोटीमध्ये स्पॉट-फिक्सिंग केल्याचे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ याने मान्य केले असून साऱ्यांची माफी मागितली आहे. या प्रकरणी आसिफला सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती, त्यापैकी पाच वर्षांची शिक्षा पूर्ण झाली आहे. बुधवारी प्रेस क्लबमध्ये त्याने सर्वाची बिनशर्त माफी मागितली आहे. एकामागून एक स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाचे खुलासे येत असून काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर यानेही स्पॉट-फिक्सिंग केल्याचे मान्य केले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिलेली शिक्षा मला मान्य आहे, असे आसिफ पत्रकार परिषदेमध्ये बोलत होता. तो पुढे म्हणाला की, माझ्या हातून जे काही घडले त्याबद्दल मला क्षमा असावी. लक्षावधी देशवासीयांनी दिलेल्या प्रेमाचा मी अनादर केला आहे. जेव्हा मी माझ्या कारकिर्दीकडे मागे वळून पाहतो, तेव्हा मला माझीच लाज वाटते. ज्या खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे त्यांना माझी विनंती असेल की, त्यांनी खेळामध्ये होणाऱ्या गैरव्यवहारापासून लांब राहावे. खेळातील गैरव्यवहार रोखण्यासाठी मी आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाची (पीसीबी) सर्वतोपरी मदत करायला तयार आहे.
या प्रकरणात दोषी आढळल्यावर कर्णधार सलमान बट्ट आणि आसिफ यांना दहा वर्षांची बंदी शिक्षा सुनावण्यात आली होती, पण त्यांनी आपली चूक कबूल करत क्षमा मागितल्याने त्यांची शिक्षा सात वर्षांची करण्यात आली. यामध्ये कमीत कमी पाच वर्षांच्या निलंबनाची कारवाई त्यांच्यावर करण्यात आली आहे, तर यापुढील दोन वर्षे हे दोघेही आयसीसीच्या लाचलुचपत विरोधी समितीच्या देखरेखीखाली राहतील.
आसिफ याबाबत म्हणाला की, माझ्या चुकांमुळे मला बरेच काही भोगावे लागले आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनी मी देशवासीयांना सांगू इच्छितो की, माझ्यावरील निलंबनाची कारवाई पूर्ण झाल्यावर झालेल्या चुका सुधारण्यावर माझा भर असेल. माझ्या कुटुंबीयांनाही या प्रकरणामुळे बरेच भोगावे लागले आहे, त्यामुळे आता एका नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा माझा मानस आहे. ज्या प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले ते मला स्वीकारतील, अशी आशा आहे.