जिद्द व महत्त्वाकांक्षा असेल तर ग्रँड स्लॅमच्या विजेतेपदाच्या मार्गात वयाचा अडथळा येत नाही याचाच प्रत्यय भारताच्या लिअँडर पेस याने घडविला. त्याने चेक प्रजासत्ताकच्या राडेक स्टेपानेक याच्या साथीत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील दुहेरीत विजेतेपद पटकाविले. त्यांनी अंतिम लढतीत अॅलेक्झांडर पेया व ब्रुनो सोरेस यांच्यावर ६-१, ६-३ असा सफाईदार विजय मिळविला.
पुरुष दुहेरीतील पेसचे हे आठवे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद आहे. त्याने पुरुष व मिश्रदुहेरीतील विजेतेपदांसह एकूण चौदा ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळविली आहेत. खुल्या स्पर्धाच्या युगात ग्रँड स्लॅमच्या दुहेरीत विजेतेपद मिळविणारा सर्वात वयस्कर खेळाडू होण्याची विक्रम पेस याने केला. ग्रँड स्लॅम स्पर्धेचा हा माझा ३१वा अंतिम सामना असून आजपर्यंत मला लाभलेल्या सहकाऱ्यांपैकी हा एक महान साथीदार आहे. आमच्यामध्ये अतिशय चांगला समन्वय आहे. त्यामुळेच आम्ही एकतर्फी विजय मिळवू शकलो असेही पेस याने सांगितले. स्टेपानेक याने पेसच्या खेळाचे कौतुक करीत सांगितले, पेस हा चाळीस वर्षांचा खेळाडू आहे असे कोणाला खरे वाटणार नाही. त्याचा खेळ युवा खेळाडूंनाही लाजवणारा खेळ आहे. असा जोडीदार लाभणे हे केवळ नशीबच असते आणि सुदैवाने मला ही संधी मिळाली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2013 12:49 pm