आचारसंहितेचा भंग न करताही बऱ्याच गोष्टी न बोलूनही सांगता येतात, बऱ्याचदा हे राजकारण्यांच्या बाबतीत घडत असले तरी भारताचा चतुर कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने ‘स्पॉट-फिक्सिंग’बाबतच्या काही प्रश्नांवर सूचक भाष्य केले. पण हे भाष्य करताना त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)चे नियमही पाळले आणि दुसरीकडे यासंबंधित प्रश्नांना उत्तरेही दिली. ‘स्पॉट-फिक्सिंग’ संदर्भातील प्रश्नांवर मी योग्य वेळी उत्तरे देईन, असे बोलतानाच त्याने यावरील मौन सोडले.
चॅम्पियन्स करंडकाच्या निमित्ताने गुरुवारी बर्मिगहॅम येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी धोनी चॅम्पियन्स करंडकसंदर्भातील प्रश्नांनाच उत्तरे देईल, असे भारतात झालेल्या पत्रकार परिषदेप्रमाणे सांगण्यात आले होते.
‘‘जर मी या प्रश्नांची उत्तरे भारतीय पत्रकारांना दिली नाहीत, तर त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला कशी देऊ, याचे काहीही कारण मला दिसत नाही,’’ असे धोनीने ‘स्पॉट-फिक्सिंग’वर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.
चॅम्पियन्स करंडक जिंकल्यावर भारताची प्रतिष्ठा सुधारेल का, असे विचारल्यावर धोनी म्हणाला की, ‘‘या साऱ्या प्रकरणाने प्रतिमा डागाळलेली नाही. जर मी सखोल बोललो तर या प्रश्नाचे उत्तर दिल्यासारखे असेल आणि मी योग्य वेळी या प्रश्नाचे उत्तर देईन.’’

पाच गोलंदाजांनिशी खेळणार
आशियाई खंडापेक्षा इथले वातावरण फार वेगळे आहे. त्यामुळे संघाची योग्य निवड आम्हाला करावी लागेल. वातावरण आणि नवीन नियमांनुसार आम्हाला संघात गोलंदाज खेळवावे लागतील. त्यामुळे आम्ही पाच गोलंदाजांनिशी खेळण्यावर भर देऊ.

जडेजा संघाची मोठी संपत्ती
रवींद्र जडेजामुळे संघाचा योग्य समतोल साधला जातो. तो संघाची मोठी संपत्ती आहे. तो १० षटके पूर्ण टाकतोच, पण त्याचबरोबर तळाला चांगली फलंदाजीही करतो. जडेजा या स्पर्धेत चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे.

रोहित शर्मा राखीव सलामीवीर
मुरली विजय आणि शिखर धवन हे दोघेही चांगले सलामीवीर आहेत आणि ते चांगल्या फॉर्मातही आहेत. सातत्याने त्यांच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे या दोघांनाच आम्ही सलामीला पाठवू. त्यानंतर जर गरज वाटली तर रोहित शर्मा हा सलामीवीराचा आणखी एक पर्याय आमच्यापुढे असेल. माझ्या मते दिनेश कार्तिक हा मधल्या फळीतील फलंदाज आहे.

मंगळवारीसुद्धा धोनीने स्पॉट-फिक्सिंग संदर्भातील याच प्रश्नांना बगल दिली होती. ते प्रश्न असे होते-
प्रश्न १ : भारतीय क्रिकेटचे संघनायक म्हणून तू का मौन पाळले आहेस?
प्रश्न २ : चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत कोणतेही चुकीचे घडणार नाही, याची तू भारतीय क्रिकेटरसिकांना खात्री देऊ शकशील का?
प्रश्न ३ : चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेप्रसंगी खेळाडूंवर या घटनांचा प्रभाव पडेल का?
प्रश्न ४ : विंदू दारा सिंगला तू व्यक्तीश: ओळखतोस का?

‘स्पॉट-फिक्सिंग’ बाबतच्या प्रश्नांना धोनीने अशा प्रकारे उत्तरे दिली
प्रश्न : कल्पना कर, जर तुम्ही चॅम्पियन्स करंडक जिंकलात तर भारतीय क्रिकेटरसिकांचा विश्वास पुन्हा मिळवता येईल का?
उत्तर : मला एक गोष्ट माहीत आहे की, मी व्यक्तीश: वर्तमानकाळात जगतो. माझा कल्पनांवर विश्वास नाही. वास्तववादावर माझा भरोसा आहे.
प्रश्न : याविषयीच सखोलतेने बोलायचे तर, गेले काही वष्रे होतास तसाच तू शांत, तणावमुक्त आहेस का?
उत्तर : तुम्ही मला उत्तर देण्यास भाग पाडत आहात. पण नक्की जेव्हा वेळ येईल, तेव्हा मी उत्तर देईन. सध्याच्या प्रत्येक घडामोडींपासून मात्र आम्ही दूर राहू इच्छितो. संघाच्या उत्साहाविषयी सांगायचे तर तो उत्तम आहे.