भारताविरुद्धच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत दारुण पराभव पत्करल्यामुळे श्रीलंकेचे माजी कर्णधार मव्‍‌र्हन अटापट्टू यांनी राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडले आहे.
गेल्या तीन महिन्यांत श्रीलंकेने पाकिस्तान आणि भारताविरुद्धच्या कसोटी मालिका गमावल्या. या पाश्र्वभूमीवर अटापट्टू यांनी श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. श्रीलंका क्रिकेट मंडळाचे प्रभारी प्रमुख सिदात वेट्टीमुनी यांनी अटापटू यांचा राजीनामा स्वीकारला आहे. अटापट्टू एके काळी श्रीलंकेच्या फलंदाजीचे प्रमुख आधारस्तंभ होते. २०११पासून अटापट्टू श्रीलंकेचे फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. या कालखंडात काही काळ त्यांनी प्रभारी मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते.
सप्टेंबर २०१४मध्ये पॉल फारब्रेस यांनी श्रीलंकेचे प्रशिक्षकपद सोडून इंग्लंडच्या साहाय्यक प्रशिक्षकपदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी अटापट्टू यांनी श्रीलंकेच्या संघाला मार्गदर्शनाची सूत्रे स्वीकारली. ४४ वर्षीय अटापट्टू यांनी ९० कसोटी आणि २६८ एकदिवसीय सामन्यांत अनुक्रमे ५५०२ आणि ८५२९ धावा केल्या आहेत. हथुरुसिंघे यांच्याकडे सूत्रे जाणार?
श्रीलंका क्रिकेट मंडळ मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी श्रीलंकेचे माजी फलंदाज चंडिका हथुरुसिंघे यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या संघाला मार्गदर्शन करताना त्यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीत बांगलादेशने विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत भरारी घेतली. याचप्रमाणे पाकिस्तान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यासारख्या बलाढय़ संघांविरुद्धच्या लागोपाठच्या एकदिवसीय मालिका जिंकण्याची किमया साधली. याचप्रमाणे ग्रॅहम फोर्ड यांचे नावसुद्धा चर्चेत आहे.