पीटीआय, नवी दिल्ली

वयाच्या नव्वदीनंतरही पूर्णपणे तंदुरुस्त आणि इतरांसाठी सदैव प्रेरणास्त्रोत असलेल्या मिल्खा सिंग यांना महिनाभरापूर्वी करोनाची लागण झाली होती. पण दररोज व्यायाम आणि धावण्याचा सराव करणाऱ्या मिल्खा यांना करोनावर मात करण्याचा पूर्ण विश्वास होता. अवघ्या तीन-चार दिवसांत मी पूर्ण बरा होईन, हा दृढनिश्चय त्यांनी केला होता. पण करोनाचा विळखा घट्ट होत गेला आणि महिनाभरापासून झुंज देणाऱ्या मिल्खा यांची प्राणज्योत अखेर शुक्रवारी रात्री मालवली.

आयुष्यभर अनेक संकटांवर मात करत धैर्याने, जिद्दीने पुढे वाटचाल करणाऱ्या मिल्खा सिंग यांना आपण करोनावरही सहज मात करू, असा विश्वास होता. त्यामुळेच करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मी तीन-चार दिवसांत बरा होईन, ही मिल्खा यांची पहिली प्रतिक्रिया होती. अखेर करोनाशी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर मिल्खा यांनी शुक्रवारी रात्री अखेरचा श्वास घेतला.

‘‘मला करोनाची लागण झाली असून मी पूर्णपणे बरा आहे. मला कोणताही त्रास जाणवत नाही. ताप, सर्दी, खोकला यापैकी कोणतीही लक्षणे नाहीत. करोना दूर पळून जाईल. मी तीन-चार दिवसांत बरा होईन, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. घरातील आचारी तापाने फणफणल्याचे त्याने आमच्यापासून लपवले होते. पण नंतर त्याला आम्ही गावी पाठवले. हे कळल्यानंतर आम्ही सर्वानीच करोना चाचणी करवून घेतली होती. मला कोणतीही लक्षणे नसताना करोनाची लागण झाल्याने मी चकित झालो होतो. दरदिवशी व्यायाम आणि धावण्याचा सराव करत असून मी करोनाच्या संसर्गातून लवकर बरा होईन, याची खात्री आहे,’’ असे मिल्खा यांनी करोनाची लागण झाल्यानंतर सांगितले होते.

मात्र शुक्रवारी संध्याकाळी मिल्खा यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाली होती. त्यांना प्रचंड ताप होता आणि प्राणवायूची पातळीही खालावली होती. पीजीआयएमईआर रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. ‘‘रुग्णालयातील डॉक्टरांनी मिल्खा यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्याचबरोबर जगभरातील चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी देवाकडे प्रार्थना केली होती. या सर्वाचे आम्ही आभार मानतो,’’ असेही या पत्रकात म्हटले आहे.

मिल्खा यांच्या निधनानंतर पीजीआयएमईआर रुग्णालयानेही शोक व्यक्त केला. ‘‘वैद्यकीय पथकाने अथक परिश्रम घेऊनही गंभीर परिस्थितीत असलेल्या मिल्खा यांचे प्राण वाचवू शकले नाहीत. कडवी झुंज दिल्यानंतर मिल्खा यांची प्राणज्योत शुक्रवारी रात्री मालवली. मैदानावरील आणि मैदानाबाहेरील अद्वितीय कामगिरीमुळे मिल्खा यापुढेही सदैव स्मरणात राहतील,’’ असे पीजीआयएमईआर रुग्णालयाचे संचालक प्रा. जगत राम यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात मिल्खा यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून मिल्खा यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल केले होते. पण नंतर त्यांना चंडीगडमधील पीजीआयएमईआर रुग्णालयात महिनाभरापूर्वी दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांचा करोना अहवाल नकारात्मक आला होता. मात्र प्राणवायू पातळी कमी झाल्यामुळे ३ जून रोजी मिल्खा यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. गुरुवारी संध्याकाळपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर होती. घरातील कर्मचाऱ्यांमुळे मिल्खा आणि त्यांची पत्नी निर्मल यांना करोनाची लागण झाली होती.

शासकीय इतमामात अंतिम संस्कार

चंडीगड : स्वातंत्र्यानंतरच्या काळात आपल्या भन्नाट वेगाने मैदान गाजवणाऱ्या मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी रात्री करोनामुळे निधन झाले. शनिवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. कुटुंबीय आणि काही मान्यवरांच्या उपस्थितीत साश्रूनयनांनी त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू, पंजाबचे राज्यपाल व्ही. पी. सिंग बदनोर, अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल तसेच हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग उपस्थित होते.