मिल्खा सिंग यांना मुलगा जीवची आदरांजली

पीटीआय, चंडीगड

माझा सर्वात चांगला मित्र, मार्गदर्शक आणि सल्लागार अशा तिन्ही भूमिका निभावणाऱ्या वडिलांच्या निधनाचा धक्का पचवण्यासाठी मला आयुष्यभराच्या लवचीकतेची आवश्यकता आहे, अशा शब्दांत गोल्फपटू जीव याने महान धावपटू मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात अ‍ॅथलेटिक्समध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या मिल्खा यांचे शुक्रवारी करोनामुळे निधन झाले. ४९ वर्षीय जीव म्हणाला की, ‘‘रविवारी ‘फादर्स डे’ असल्याने आदल्या दिवशी वडिलांना गमावल्याची आठवण कायम येत राहील. ते माझ्यासाठी वडिलांपेक्षाही खूप काही होते. ते माझे चांगले मित्र, मार्गदर्शक आणि सल्लागार होते. या सर्व कठीण परिस्थितीवर मात करू शकेन, अशी आशा आहे. वडिलांच्या अंत्यसंस्कारा वेळची एक गोष्ट नेहमीच लक्षात राहील. भारतीय सैन्यदलाची गाडी पार्थिवाजवळ येऊन थांबली आणि सैन्यदलातील जवानांनी वडिलांना श्रद्धांजली वाहिली. मिल्खा कुटुंबीय भारतीय सैन्यदलाप्रति नेहमीच कृतज्ञ असून त्यांचे पुन्हा आभार मानावेसे वाटत आहेत.’’

मिल्खा यांच्या निधनाआधीच त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचेही करोनामुळे निधन झाले होते. याबद्दल जीव म्हणाला की, ‘‘अवघ्या काही दिवसांत मी माझी आई आणि वडील दोन्ही गमावले आहेत. पण लोकांनी आपल्या कुटुंबातीलच व्यक्ती दिवंगत झाल्याप्रमाणे मला शोकसंदेश पाठवले आहेत. वडिलांचे चाहते आणि त्यांचे शुभचिंतक आमच्या पाठीशी असून आम्ही त्यांचेही आभार मानू इच्छितो.’’