फुटबॉलचे अनभिषिक्त सम्राट म्हणून नावलौकिक मिळविलेल्या पेले यांच्या उपस्थितीत व घरच्या मैदानावर सर्वोत्तम विजय मिळविण्यासाठी अ‍ॅटेलटिको कोलकाता संघ उत्सुक झाला आहे. मात्र त्याकरिता त्यांना मंगळवारी केरळ ब्लास्टर्स संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
कोलकाता संघाचा घरच्या मैदानावर हा पहिलाच सामना असून पेले या सामन्यास उपस्थित राहणार आहेत. कोलकाता संघाने गतवर्षी केरळ संघावर १-० अशी मात करीत इंडियन सुपरलीग स्पर्धा जिंकली होती. मात्र यंदा त्यांच्या संघास अनेक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळावे लागत आहे. महत्त्वाचा खेळाडू हेल्डेदर पोस्तिगाने केलेल्या दोन गोलांमुळेच त्यांना चेन्नईविरुद्ध यंदाच्या लीगमध्ये ३-२ असा विजय मिळाला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. त्याच्या अनुपस्थितीत त्यांच्या संघाला गोव्याविरुद्ध १-१ अशी बरोबरी स्वीकारावी लागली. त्यातच त्यांच्या बलजित सहानीला बेशिस्त वर्तनाबद्दल लाल कार्ड दाखविण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्यावर दोन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे तसेच त्याच्यावर पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. कोलकाता संघाचे प्रशिक्षक अन्तानिओ लोपेझ हबास यांनाही ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पोस्तिगा व बलजीत यांच्याबरोबरच अर्नव मोंडाल व रिनो अन्तो हे दोन्ही खेळाडूही उद्याच्या लढतीत खेळू शकणार नाही. विश्वचषक पात्रता फेरीत ते भारतीय संघाकडून खेळत आहेत. या खेळाडूंच्या अनुपस्थितीत कोलकाता संघाची मुख्य मदार इयान ह्य़ुम व अराटा उझुमी यांच्यावर आहे.
कोलकाता व केरळ यांनी या स्पर्धेत आतापर्यंत प्रत्येकी एक सामना जिंकला आहे तर एक सामन्यात त्यांनी बरोबरी स्वीकारावी लागली आहे.
केरळ संघाची मुख्य भिस्त अर्सेनेल संघाचा सँचेझ व्ॉट, बार्सिलोना अकादमीचा जोशुए प्रिटो, गोलरक्षक ख्रिस्तोफर बेवॉटर, ब्रुनो पेरोनी यांच्यावर आहे. या खेळाडूंनी या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. प्रिटो याने आपल्या संघास नॉर्थईस्ट युनायटेड संघाविरुद्ध ३-१ असा विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यांच्या खेळाडूंमध्ये शेवटपर्यंत जिद्दीने खेळण्याची क्षमता आहे तसेच सामन्यास कलाटणी देण्याबाबतही त्यांचे खेळाडू ख्यातनाम आहेत.