अ‍ॅटलेटिको माद्रिदचा चेल्सीवर ३-१ असा विजय; अंतिम फेरीत रिअल माद्रिदशी सामना
एकदा कोणतीही गोष्ट मनाशी पक्की केली की, ती तडीस नेण्यासाठी जिवाचे रान करायचे, अशी जिद्द त्यांच्यामध्ये या मोसमात दिसली. गेली तब्बल ४० वर्षे त्यांना चॅम्पियन्स लीग स्पर्धेची अंतिम फेरी तर सोडाच, पण उपांत्य फेरीही गाठता आली नव्हती. पण यंदा त्यांनी खुणगाठ बांधली आणि जवळपास ४० वर्षांनी अ‍ॅटलेटिको माद्रिद संघाने अंतिम फेरीत पोहोचण्याचा मान मिळवला. चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात अनुभवी चेल्सीला ३-१ असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत त्यांचा सामना रिअल माद्रिदशी होणार आहे.
बुधवारी रात्री स्टॅम्फर्ड ब्रिजचे स्टेडियम चाहत्यांनी कडेकोट भरलेले होते, उत्साह ओसंडून वाहत होता. कारण या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा, पण मोठय़ा सामन्यांचा अनुभव नसलेला अ‍ॅटलेटिको माद्रिदचा संघ एका बाजूला होता, तर दुसऱ्या बाजूला दमदार खेळाडू आणि अनुभवी प्रशिक्षक असा ताफा चेल्सीकडे होता. त्यामुळे या सामन्यात सातत्याने मनोबल उंचावलेला संघ बाजी मारणार की, अनुभवाच्या शिदोरीच्या जोरावर चेल्सी अंतिम फेरीत पोहोचणार, याची साऱ्यांनाच उत्सुकता होती. या संघाचा पहिला उपांत्य फेरीचा सामना गोलविरहित झाला होता, त्यामुळे या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. दुसरा उपांत्य फेरीचा सामना गोलरहित झाला असता, तर अ‍ॅटलेटिको माद्रिदला अंतिम फेरीचे दरवाजे खुले झाले असते, पण त्यांनी हा सामना गंभीरपणे घेतला आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले.
झोकात सुरू झालेल्या सामन्यामध्ये चेल्सी आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद यांच्यामध्ये चेंडूवर ताबा मिळवण्याचे युद्ध सुरू झाले, आक्रमणे दोन्ही बाजूंनी होत होती. पण पहिले आक्रमण यशस्वी ठरले ते चेल्सीचा कर्णधार फर्नाडो टोरेसचे. यापूर्वी टोरेस अ‍ॅटलेटिको माद्रिदचा माजी कर्णधार होता आणि त्यांच्याविरुद्ध पहिला गोलही त्यानेच केला. सामन्याच्या ३६व्या मिनिटाला टोरेसने पहिला गोल लगावला आणि चेल्सीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा वाढल्या, पण आक्रमणाला आक्रमणानेच जवाब द्यायला अ‍ॅटलेटिको माद्रिदने सुरुवात केली. यामध्ये अ‍ॅड्रियन लोपेझने ४४व्या मिनिटाला अ‍ॅटलेटिको माद्रिदकडून पहिल्या गोलची नोंद करत ‘आमच्यासारखे आम्हीच’ हे चेल्सीला दाखवून दिले. त्यामुळे मध्यंतराला १-१ अशी बरोबरी असताना सामना दोलायमान अवस्थेत होता.
मध्यंतरानंतर बराच वेळ आक्रमणे होत राहिली, पण दोन्ही संघांच्या बचावपटूंनी अप्रतिम खेळ केल्यामुळे गोल होऊ शकले नाहीत. अखेर डिएगो कोस्टाने पेनल्टीवर ६०व्या मिनिटाला गोल करत अ‍ॅटलेटिको माद्रिदला आघाडी मिळवून दिली. कोस्टाचा या स्पर्धेतील हा ३६वा गोल होता. यावेळी बरोबरी करण्यासाठी चेल्सीचा संघ जिवाचे रान करत होता, पण अपयशाखेरीज त्यांच्या हाती काहीही लागत नव्हते. सामन्याच्या ७२व्या मिनिटाला अर्दा तुरानने गोल लगावत संघाची आघाडी अधिक भक्कम करत अंतिम फेरीचा दरवाजा ठोठावला. १-३ अशी पिछाडी झाल्यावर चेल्सीचा संघ बिथरला, पण त्यांचे सर्व प्रयत्न निष्पळ ठरले आणि अनुभवावर सातत्यपूर्ण कामगिरीने मात केल्याचेच या सामन्यात पाहायला मिळाले.