चेन्नई येथे सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सोमदेव देववर्मन आणि युकी भांबरी हे भारताचे युवा टेनिसपटू एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. स्पेनचा जॉर्डी सॅम्परने पोटाची दुखापत आणि उलटीच्या त्रासामुळे माघार घेतल्याने सोमदेवला विजयी घोषित करण्यात आले. दुसऱ्या लढतीत युकीने बिगरमानांकित फ्रान्सच्या ल्युइस पौऊलीवर ३-६, ६-२, ६-२ अशी मात केली. पहिल्या गेममध्ये पौऊलीने बेसलाइवरुन शानदार खेळ करताना युकीला निष्प्रभ केले. मात्र सध्याच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या युकीने अचूक सव्‍‌र्हिसवर भर देत आणि अफलातुन परतीच्या फटक्यांच्या जोरावर दुसरा सेट जिंकत बरोबरी केलीत. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये थकलेल्या पौऊलीसमोर युकीने दमदार खेळाचे प्रदर्शन करत तिसऱ्या सेटसह सामनाजिंकला.
एकेरी प्रकारात दिमाखदार विजय मिळवणाऱ्या युकीने दुहेरीतही विजयी आगेकूच केली. न्यूझीलंडच्या मायकेल व्हीनसच्या साथीने खेळताना या जोडीने इटलीच्या थॉमस फॅबिओनो आणि अर्जेटिनाच्या ऑगस्टिन वेलोटी जोडीवर असा ६-२, ६-३ विजय मिळवला. एन.श्रीराम बालाजी आणि ब्लाझ रोला जोडीने स्टीव्हन डिइझ आणि डॅनियल मुनोध-ला नेव्हा जोडीवर ६-३, ६-२ अशी मात करत विजयी आगेकूच केली.
अन्य लढतींमध्ये रशियाच्या अलेक्झांडर क्रुडयास्तेव्हने भारताच्या साकेत मायनेनीचे आव्हान ६-०, ६-२ अशा दणदणीत विजयासह संपुष्टात आणले. संपूर्ण कोर्टचा सुरेख उपयोग करत ताकदवान फटके, परतीच्या फटक्यांवरचे प्रभुत्व आणि चांगली सव्‍‌र्हिस करत अलेक्झांडरने साकेतचा धुव्वा उडवला. उपांत्य फेरीत त्याचा मुकाबला द्वितीय मानांकित इव्हगने डॉनस्कायशी होणार आहे. इव्हगने भारताच्या सनम सिंगवर ७-५, ६-४ असा विजय मिळवला.