एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा

जागतिक एटीपी फायनल्सचे कारकीर्दीतील पहिलेवहिले विजेतेपद पटकावण्याचे ध्येय विक्रमी २० ग्रँडस्लॅम विजेत्या स्पेनच्या राफेल नदालने ठेवले आहे. अव्वल आठ खेळाडूंमध्ये वर्षांअखेरीस होणारी ही स्पर्धा नदालला एकदाही जिंकता आलेली नाही.

सर्बियाचा अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने विक्रमी सहाव्यांदा एटीपी फायनल्सचे विजेतेपद पटकावण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. करोना साथीचा संसर्ग असल्याने प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा होणार आहे. एटीपी फायनल्सच्या असणाऱ्या नियमानुसार जागतिक क्रमवारीतील अव्वल आठ खेळाडू या स्पर्धेत खेळतात. दुखापतीमुळे अर्थातच विक्रमी २० ग्रँडस्लॅम विजेत्या रॉजर फेडररची अनुपस्थिती या स्पर्धेतही असणार आहे.

रविवारी सलामीच्या लढतीत डॉमिनिक थिम विरुद्ध स्टेफानोस त्सित्सिपास हे आमनेसामने येणार आहेत. त्यापाठोपाठ नदालची लढत आंद्रे रुब्लेवशी होणार आहे. सोमवारी जोकोव्हिचची लढत दिएगो श्वार्ट्झमनशी आहे. जोकोव्हिच आणि नदाल हे वेगवेगळ्या गटात असल्याने ते उपांत्य फेरीपर्यंत आमनेसामने येण्याची शक्यता नाही. जोकोव्हिचला यंदा वर्षांअखेरीस अग्रस्थान राखण्यात यश आले आहे.