एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा

सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि स्पेनचा राफेल नदाल यांनी एटीपी फायन्सल टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

जोकोव्हिचला यंदा विक्रमी सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. त्याने गटवार साखळीतील अखेरच्या लढतीत जर्मनीच्या सातवा मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हवर ६-३, ७-६ असा विजय मिळवला.

नदालने पाच वर्षांत प्रथमच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले. गटवार साखळीतील अखेरच्या लढतीत नदालने ग्रीसचा गतविजेता स्टेफानोस त्सित्सिपासला ६-४, ४-६, ६-२ असे पराभूत केले. उपांत्य फेरीत नदाल विरुद्ध मेदवेदव आणि जोकोव्हिच विरुद्ध डॉमिनिक थिम अशा लढती रंगतील.

आजचा सामना

* राफेल नदाल वि. डॅनिल मेदवेदेव

* सामन्याची वेळ : सायं. ७:३० वा.

* थेट प्रक्षेपण : सोनी टेन २

प्रज्ञेश उपांत्य फेरीत

ओर्लाडो चॅलेंजर टेनिस स्पर्धा

ओर्लाडो : भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरनने अमेरिकेतील ओर्लाडो चॅलेंजर टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्याने कझाकस्तानच्या सहाव्या मानांकित दिमित्री पोपकोवर ६-०, ६-३ असा सहज विजय मिळवला. चौथ्या मानांकित प्रज्ञेशने पहिल्या सेटमध्ये सर्व गेम जिंकत सुरुवातच छान केली होती. दुसऱ्या सेटमध्येही पोपकोला त्याने वरचढ होण्याची संधी दिली नाही. प्रज्ञेशने गेल्या आठवडय़ात अमेरिकेत झालेल्या कॅरी चॅलेंजर स्पर्धेतही उपविजेतेपद मिळवले होते.