दरवर्षी साधारणपणे एप्रिल-मे महिन्यादरम्यान पुरुषांच्या ‘आयपीएल’बरोबरच महिलांची ट्वेन्टी-२० चॅलेंज क्रिकेट स्पर्धा रंगते. परंतु यंदा करोनामुळे प्रथमच नोव्हेंबर महिन्यात भारताबाहेर ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. बुधवार, ४ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या या स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामात सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलोसिटी हे तीन संघ सहभागी होणार असून संयुक्त अरब अमिरातीतील शारजा येथे हे सामने आयोजित करण्यात आले आहेत. वर्षांच्या प्रारंभी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या भारतीय महिला संघातील खेळाडूंच्या पुनरागमनाकडे चाहत्यांचे यंदा विशेष लक्ष लागून आहे. विदेशांतील अनेक मातब्बर खेळाडूंनी यंदा या स्पर्धेतून माघार घेतल्याने देशातील महिला क्रिकेटला पुन्हा नवी भरारी देण्याचे आव्हान भारतीय खेळाडूंपुढे आहे. प्रेक्षकांविना खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तिन्ही संघांच्या सामर्थ्यांचा घेतलेला हा आढावा –

व्हेलोसिटी

भारताची सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या मिताली राजच्या नेतृत्वाखालील व्हेलोसिटी संघात शफाली वर्मा, वेदा कृष्णमूर्ती, सुषमा वर्मा अशा एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाजाचा भरणा आहे. विशेषत: शफालीने विश्वचषकात वेगवान फलंदाजी करून सर्वाचे लक्ष वेधले होते. गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानणाऱ्या या संघात इंग्लंडची डॅनिएल व्हॅट, शिखा पांडे यांच्या रुपात अनुभवी खेळाडूही उपलब्ध आहेत. मितालीने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असली तरी या स्पर्धेत तिचा अनुभवा संघासाठी लाभदायी ठरेल.

सुपरनोव्हाज

सलग दोन वेळा महिला चॅलेंज स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या सुपरनोव्हाजला यंदा जेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्याची सुवर्णसंधी आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तिच्या नेतृत्वगुणांचा संघाला लाभ होऊ शकतो. सुपरनोव्हाजमध्ये जेमिमा रॉड्रिग्ज, पूनम यादव, राधा यादव यांसारख्या युवा-अनुभवी भारतीय खेळाडूंबरोबरच श्रीलंकेची नामांकित फलंदाज चामरी अटापटूचा समावेश आहे.

ट्रेलब्लेझर्स

भारताची प्रतिभावान सलामीवीर स्मृती मानधनाकडे ट्रेलब्लेझर्स या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले असून तिला मार्गदर्शन करण्यासाठी पुनम राऊत, झुलन गोस्वामी यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत. दीप्ती शर्मा, सोफी एकेलस्टोन यांच्या रुपात अष्टपैलूही ट्रेलब्लेझर्सच्या ताफ्यात असल्याने यंदा हा संघ विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकन खेळाडूही या संघात आहेत.

(संकलन : ऋषिकेश बामणे)