बडोदा क्रिकेट संघटनेने (बीसीए) लैंगिक छळ प्रकरणाच्या आरोपामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू अतुल बेदाडेची महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केली आहे. मात्र बेदाडे यांना या प्रकरणी निलंबित करण्याचा निर्णय ‘बीसीए’कडून मागे घेण्यात आला आहे. ‘बीसीए’चे सचिव अजित लेले यांनी ही माहिती दिली.

वरिष्ठ महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी बेदाडे यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यानंतर ‘बीसीए’कडून त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी प्राथमिक चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. त्या दरम्यान संबंधित खेळाडूंनीही बेदाडे याच्यावरील आरोप मागे घेतले होते.

बेदाडे यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या समितीने २ जूनला यासंबंधीचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर बेदाडे यांचे मार्च महिन्यात ‘बीसीए’कडून झालेले निलंबन मागे घेण्यात आले. मात्र बेदाडे यांना पुन्हा महिला क्रिकेट संघाची जबाबदारी देऊ नये, असा निर्णय ‘बीसीए’ने घेतला आहे.