22 July 2019

News Flash

आटय़ापाटय़ा वाचवण्यासाठी आटापिटा!

खेळाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यामध्ये काळानुसार परिवर्तन आणण्याची आवश्यकता असते.

|| ऋषिकेश बामणे

खेळाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यामध्ये काळानुसार परिवर्तन आणण्याची आवश्यकता असते. गेल्या काही वर्षांपासून कॅरम, खो-खो, मल्लखांब यांसारख्या स्पर्धानी काळाची गरज ओळखून युवा पिढीला आकर्षित करणाऱ्या नियमांसह तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून खेळाचा प्रसार केला. मात्र असंख्य शतकांहून पुरातन असलेला ‘आटय़ापाटय़ा’ हा खेळ या स्पर्धेत मागे पडला व आता हळूहळू शहरी भागातील मैदानातून दिसेनासाच झाल्यामुळे तो वाचवण्यासाठी आटापिटा सुरू आहे.

गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांमध्ये या खेळाचा समावेश असला तरी मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या प्रमुख भागांत या खेळाच्या स्पर्धा क्वचितच होताना आढळतात. त्याशिवाय संघटना व माजी खेळाडूंतर्फे या खेळाच्या प्रसारासाठी ठोस पावले उचलली न गेल्यामुळेच एके काळी ‘मैदानी खेळांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा हा खेळ आता हरवत चालला आहे.

मागील वर्षी राज्य अजिंक्यपद आटय़ापाटय़ा स्पर्धा शेगावला झाली, तर राष्ट्रीय स्पर्धा बेंगळूरु येथे आयोजित करण्यात आली होती. त्याशिवाय १९९८-९९ मध्ये या खेळाचा शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत समावेश करण्यात आला असून आतापर्यंत २७ खेळाडूंना हा पुरस्कार मिळाला आहे. खेळातील जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३२ जिल्हे व २८ राज्यांत हा खेळ खेळला जातो. उन्मेश शिंदे, वाशिम व गंगासागर शिंदे, उस्मानाबाद यांनी या वर्षांचे छत्रपती पुरस्कार मिळवले असून या खेळाच्या नव्या हंगामाला जून-जुलैपासून सुरुवात होणार आहे. विदर्भ, परभणी, यवतमाळ, शेगाव, औरंगाबाद येथे या खेळाच्या स्पर्धा मोठय़ा प्रमाणावर आयोजित केल्या जातात. नागपूर येथे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात महाराष्ट्र आटय़ापाटय़ा महामंडळाचे मुख्यालय आहे. एकंदर खेडय़ापाडय़ांत आटय़ापाटय़ाच्या स्पर्धाचे आयोजन नियमितपणे होत असले तरी इतर मैदानी खेळांच्या तुलनेत आटय़ापाटय़ाला दुय्यम स्थानच मिळत आहे.

आटय़ापाटय़ा हा खेळ संपूर्ण महाराष्ट्राभर आजही मोठय़ा प्रमाणावर खेळला जातो. त्याशिवाय या वर्षीच या खेळाचा शालेय स्तरावरही समावेश झाला असून खेळाडूदेखील या पुरातन खेळाकडे वळत आहेत. खेळाडूंना या खेळाचे शिक्षणात गुणदेखील देण्यात यावे, याकरिता क्रीडामंत्र्यांकडे विनंती केली असून त्यांना नोकरी मिळावी यासाठीदेखील आम्ही झटणार आहोत. त्यामुळे कबड्डी, खो-खो या खेळांना अधिक प्रकाशझोत मिळाला असला तरी आटय़ापाटय़ादेखील येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल, अशी आशा आहे.    – उल्हास नंदूरकर, प्रशिक्षक

आटय़ापाटय़ा, हुतुतू (कबड्डी), खो-खो यांसारखे पारंपरिक खेळ संपूर्ण भारतभर मातीतील खेळ म्हणून प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यानंतर कबड्डी, खो-खो खेळांनी काळानुसार नियमांमध्ये आमूलाग्र बदल केले, परंतु आटय़ापाटय़ा या सर्वाच्या तुलनेत कमी पडला. या खेळाची खेळाडूंना तंदुरुस्ती टिकवण्यासाठी फार मदत होते. मात्र राष्ट्रीय स्तरावरच या खेळासाठी कोणताही पाया नसल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर आटय़ापाटय़ाच्या स्पर्धा आयोजित होणे फारच दूर आहे. त्याशिवाय गेली ३६ वर्षे मी स्वत: शारीरिक शिक्षण मंडळात कार्यरत असून मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये या खेळाच्या स्पर्धाना मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद लाभल्याचे मी पाहिलेलेच नाही.    – गो. वि. पारगांवकर, मुंबई शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य

आटय़ापाटय़ाचा इतिहास

भारतीय मूळचा धाडसी आणि रोमहर्षक खेळ म्हणून आटय़ापाटय़ा प्रसिद्ध आहे. या खेळाचा जनक कोण अथवा हा खेळ सर्वप्रथम कुठे खेळण्यात आला, याची उत्तरे अजूनही गुलदस्त्यातच आहेत. भारताच्या विविध भागांत सूर-पाती, लोन-पाती, दर्या-बंध, सारागरी, सारामणी, तिल्ली, उप्पीनाट, उप्पू-पत्ती, चौपाल-पाती, पंचवटी, चिक्का यांसारख्या अनेक नावांनी हा खेळ ओळखला जातो. १९२५ मध्ये ब्रिटिश राजवटीत अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण संस्था या खेळाचे जतन करण्यासाठी अस्तित्वात आली. त्यांच्या पुढाकाराने एकेरी, दुहेरी आटय़ापाटय़ा, खेळाचे क्रीडांगण याविषयी नियम तयार करण्यात आले. त्यानंतर १९८२ मध्ये महाराष्ट्र आटय़ापाटय़ा महामंडळ स्थापित झाल्यावर या खेळांच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. २००७ ते २०१२ या काळात शासनातर्फे आटय़ापाटय़ासाठी पाच टक्के आरक्षणदेखील देण्यात आले होते, परंतु त्यानंतर तेदेखील बंद झाले. कबड्डीपेक्षा या खेळात दुखापत होण्याची शक्यता कमी असूनही खेळाडूंनी या खेळाकडे पाठ फिरवली.

First Published on March 15, 2019 2:49 am

Web Title: atya patya game