इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव ११ फेब्रुवारीला होण्याची दाट शक्यता आहे. याचप्रमाणे आठ संघांना कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी २१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे, असे ‘आयपीएल’चे प्रमुख ब्रिजेश पटेल यांनी गुरुवारी सांगितले.

सोमवारी ‘आयपीएल’च्या प्रशासकीय समितीच्या झालेल्या ऑनलाइन बैठकीत २०२१च्या हंगामाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. त्यानुसार खेळाडूंच्या स्थलांतरासाठी ४ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधील विश्रांतीच्या दिवसांत लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली.

चेन्नई केदारला वगळणार?

चेन्नई सुपर किंग्जच्या खात्यावर फक्त १५ लाख रुपये बाकी आहेत. त्यामुळे अधिक रक्कम खात्यावर शिलकीत राहावी, याकरिता केदार जाधव आणि पीयूष चावला यांना चेन्नईकडून वगळणे जाण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ कायम

मुंबई इंडियन्सच्या खात्यावर एक कोटी, ९५ लाख रुपये शिल्लक असून, ते आपल्या संघात बदल करण्याची शक्यता कमी आहे.

पंजाबकडे सर्वाधिक १६.५ कोटी

किंग्ज इलेव्हन पंजाबकडे सर्वाधिक १६ कोटी, ५० लाख रुपये शिलकीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून लिलावात मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. याचप्रमाणे राजस्थान रॉयल्स (१४.७५ कोटी), सनरायजर्स हैदराबाद (१०.१ कोटी), दिल्ली कॅपिटल्स (९ कोटी), कोलकाता नाइट रायडर्स (८.५ कोटी) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (६.४ कोटी) यांच्याकडूनही लिलावात मोठी गुंतवणूक होईल.