अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेदरम्यान चाहत्यांची निदर्शने

टोक्यो : जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष सेबॅस्टियन को हे राष्ट्रीय स्टेडियममध्ये बसून ११ आठवडय़ांवर येऊन ठेपलेली टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा कितपत सुरक्षित आहे, असे आश्वासन देत असतानाच निदर्शकांनी त्यांच्या या कार्यात व्यत्यय आणला. जवळपास हजारो चाहत्यांनी राष्ट्रीय स्टेडियमला धडक देत ऑलिम्पिकविरोधी घोषणाबाजी केली.

टोक्योच्या मध्यभागी असलेल्या राष्ट्रीय स्टेडियमबाहेर निदर्शकांनी रविवारी बराच गोंधळ घातला. ‘ऑलिम्पिक गरिबांसाठी मारक ठरत आहे’, ‘ऑलिम्पिकचा खेळ बंद करा’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. ‘‘करोनाचा कहर वाढत असून दिवसेंदिवस कित्येक लोक मृत्यूमुखी पडत आहेत. आरोग्यसेवेसाठी पैसे खर्च करण्यापेक्षा आमचे सरकार ऑलिम्पिकसाठी वारेमाप खर्च करत आहे. करोनाआधीच अनेक जण बेघर झाले होते, त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. आता तर परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे,’’ असे गोदामात काम करणाऱ्या ताकाशी साकामोटो यांनी सांगितले.

जपानमध्ये रंगणाऱ्या ऑलिम्पिकला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढू लागला आहे. रविवारी निदर्शकांनी रॅली काढत निदर्शने केली. त्याआधी ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली असून त्याला ३ लाख लोकांनी स्वाक्षऱ्या देऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे. जपानमधील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही ऑलिम्पिक रद्द करण्याची मागणी केली आहे. जपानमध्ये सध्या २ टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आले असून करोनाचा कहर वाढत चालला आहे. ऑलिम्पिकच्या संयोजकांनी १० हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पर्धेदरम्यान सेवा द्यावी, अशी मागणी केली आहे.

तत्पूर्वी, दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणारे तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य असलेल्या सेबॅस्टियन को यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत ४२० धावपटूंची उपस्थिती अपेक्षित होती. पण त्यापैकी नऊ जणच जपानमध्ये प्रवेश करू शकले. ‘‘सराव स्पर्धेसाठी नऊ स्पर्धक दाखल झाल्याने मी त्यांचे कौतुक करतो. ऑलिम्पिकदरम्यान हजारो स्पर्धक जपानमध्ये दाखल होणार आहेत,’’ असे को म्हणाले.