स्टिव्ह स्मिथला कसोटी मालिकेत शांत ठेवायचं असल्यास भारतीय गोलंदाजांनी सातत्यानं उजव्या यष्टीबाहेर गोलंदाजी करावी, असा लाखमोलाचा सल्ला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं भारतीय वेगवान गोलंदाजाला दिला आहे. बॉल टेंम्परिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे २०१८-१९ च्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्मिथ खेळू शकला नव्हता. त्यामुळे यावेळी त्याची भरपाई करण्यासाठी स्मिथ तयार असेल. स्मिथनं भारताविरोधात सहा कसोटी शतकं झळकावली आहेत.

स्मिथला बाद करण्यासाठी काय करावं?-
स्मिथचं फलंदाजी तंत्र सर्वांपेक्षा वेगळं आहे. तुम्ही त्याला पायावर गोलंदाजी करुच शकत नाही. अनेकदा तो उजव्या यष्टीबाहेरील चेंडूही ऑन साइडला भिरकावतो. त्यामुळे स्मिथवर वर्चस्व गाजवण्यासाठी थेट पाचव्या यष्टीवर गोलंदाजी करुन त्याच्या संयमाची कसोटी घ्यावी, असे सचिन म्हणाला.

स्मिथला चूक करण्यास भाग पाडा –
उसळत्या चेंडूसाठी तयार असल्याचं स्मिथनं म्हटल्याचं मी वाचलं आहे. स्मिथला आशा आहे की भारतीय गोलंदाज त्याच्याविरोधात सुरुवातीपासून उसळत्या चेंडूचा मारा करतील. अशा गोलंदाजी विरोधात स्मिथ आक्रमक फलंदाजी करु शकतो. पण मला वाटतेय की, उजव्या यष्टीबाहेर चेंडू टाकून त्याच्या संयमाची परीक्षा घ्यावी. सुरुवातीपासूनच स्मिथला दबावात ठेवून चूक करण्यास भाग पाडायला हवं. त्यासाठी चेंडू किती स्विंग होतोय, हे पाहणंही महत्वाचं आहे, असं सचिन म्हणाला.

बचावात्मक गोलंदाजाची निवड –
मैदानावर गवत ठेवतील की नाही, जेणेकरुन चेंडू स्विंग होईल. पण याबाबत माहित नाही. जर चेंडू स्विंग होत नसेल तर तुम्हाला स्विंग होणारा यॉर्कर चेंडू पाहायला मिळणार नाही. बुमराह, शामी, इशांत, आणि उमेश यांच्यामुळे भारतीय गोलंदाजीही आक्रमक दिसत आहे. पण संघ निवड करताना बचावात्कम गोलंदाजी निवड महत्वाची ठरणार आहे. कसोटी सामना जिंकण्यासाठी २० विकेट घेणं महत्वाचं असतं, त्यासाठीचं गोलंदाजी आक्रमण आपल्याकडे आहे. मात्र, २० विकेट घेताना धावांचा बचाव करणंही तितकच महत्वाचं आहे. त्यामुळे गोलंदाजाची निवड करताना कमी धावा देणाऱ्या आणि बळी घेणाऱ्या गोलंदाजी निवड करणं गरेजचं आहे.

(आणखी वाचा – कोहलीला ‘विराट’ कामगिरी करण्याची संधी, ‘या’ दिग्गजांचे विक्रम मोडणार? )

ऑस्ट्रेलिया संघाबाबत काय म्हणाला सचिन –
यावेळेस ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजीचा क्रम तगडा वाटतोय. स्मिथ, वॉर्नर आणि लाबुशाने ऑस्ट्रेलियासाठी महत्वाची भूमिका बजावतील. दोन सिनिअर खेळाडू आणि लाबुशाने यांच्या उपस्थितीमुळे ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजीला अधिक बळकटी आली आहे. तयारीबाबत बोलाल तर भारतीय संघही कुठेही कमी पडणार नाही. बॉर्डर-गावसकर चषकावर भारत पुन्हा एकदा नाव कोरण्याची शक्यता असल्याचंही सचिननं सांगितलं.

सचिनचा गुरुमंत्र –
डावाची धावगती आणि डाव घोषीत करण्याची वेळ कसोटीमध्ये महत्वाची असते. समजा, दिवसाखेरीस तुम्ही सन्मान्जनक धावसंख्या उभारली आहे आणि आठ विकेटही गमावल्या आहेत. अशावेळी अतिरिक्त २०-२५ धावा करण्यावर भर देण्यापेक्षा डाव घोषीत करावा. त्यानंतर समोरच्या संघाच्या झटपट विकेट घेण्याचा प्रयत्न करावा.

सलामी फलंदाजाबाबत काय म्हणाला सचिन?
कसोटी सामन्यात सलामी फलंदाजाबाबत पीटीआयशी बोलताना सचिन म्हणाला की, माझ्या मते सलामीला मयंक अग्रवाल खेळणं जवळपास नक्की आहे. सचिन म्हणाला की, ‘ कसोटी सामन्यात मयंक खेळणार हे नक्की आहे. कारण सध्या तो मोठ्या खेळी करत आहे. जर रोहित शर्मा कसोटीमध्ये उपलब्ध नसेल तर मयंकला खेळवावं. तसेच दुसरा सलामी फलंदाज म्हणून इतर खेळाडूच्या फॉर्मचा विचार करण्यात यावा.

विराटच्या अनुपस्थितीचा भारताला फटका, पण…..
विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीचा भारतीय संघाला फटका बसू शकतो. पण भारताची बेंच स्ट्रेंथ मजूबत आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे भारत मालिकेत टिकून राहणार आहे.

आणखी वाचा : पितृशोक झालेल्या मोहम्मद सिराजसाठी BCCI अध्यक्षाचा खास संदेश, म्हणाला…

पुजाराचं महत्व –
सचिन तेंडुलकर म्हणाला की, कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराची उपस्थिती भारतीय संघासाठी महत्वाची आहे. पुजारा-विराट या जोडगोळीनं भारताला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढलं आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत पुजारावर भारतीय फलंदाजीची मदार असेल.

आणखी वाचा : जेव्हा रवी शास्त्री बीसीसीआयच्या अध्यक्षांनाच विसरतात तेव्हा…