महेंद्रसिंह धोनीनंतर भारतीय संघाचं नेतृत्व विराट कोहलीकडे आलं. आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या विराट कोहलीचा कर्णधार म्हणून मैदानातला वावरही तितकाच आक्रमक असतो. अनेकदा मैदानात त्याचे प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूशी खटके उडताना आपण पाहिले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाचे क्रिकेट खेळाडू हे एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्लेजिंगसाठी प्रसिद्ध मानले जायचे. मात्र आयपीएल नंतर, अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू करारासाठी विराट कोहलीला डिवचायला घाबरायचे असा खुलासा माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कने केला आहे. Big Sports Breakfast या स्थानिक वाहिनीच्या कार्यक्रमात तो बोलत होता.

“क्रिकेटमध्ये जिथे पैशाचा विषय येतो तिकडे भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर किती मोठा आहे हे सर्वांना माहिती आहे. माझ्या मते ऑस्ट्रेलिया आणि इतरही संघाचे खेळाडू गेल्या काही काळात याच कारणामुळे भारताच्या दबावासमोर बळी पडायचे. खेळाडू विराट कोहली किंवा कोणत्याही भारतीय खेळाडूला स्लेजिंग करायला घाबरायचे, कारण एप्रिलमध्ये त्यांच्यासोबतच आयपीएलमध्ये खेळायचं असतं.” मायकल क्लार्कने मोठा गौप्यस्फोट केला. क्लार्कच्या मते आयपीएलमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंची मैदानातली आक्रमकता ही कमी झाली. सर्व खेळाडूंना आयपीएल लिलावात मोठ्या बोलीची अपेक्षा असते त्यामुळे विराट कोहलीला स्लेजिंग करायला ते घाबरतात.

“मी विराट कोहलीला अजिबात डिवचायला जाणार नाही. त्याने मला RCB मध्ये निवडावं…जेणेकरुन माझे पुढचे काही महिने चांगले जातील. याच काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेट हे नरमलं. याआधी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा मैदानावरचा दबदबा आपण अनुभवला आहे, पण आता तो राहिला नाही.” क्लार्क आयपीएलमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संस्कृतीवर झालेल्या परिणामांविषयी बोलत होता. सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.

अवश्य वाचा – प्रेक्षकांविना आयपीएल खेळवण्यास हरभजन सिंहचा पाठींबा