ऑस्ट्रेलियाचा कप्तान मायकेल क्लार्क याने २०१२ या वर्षांची सांगता शानदार शतकाने केली. त्याचप्रमाणे शेन वॉटसनसोबत चौथ्या विकेटसाठी त्याने १९४ धावांची भक्कम भागीदारीही केली. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाची मधली फळी कोसळली. मात्र मिचेल जॉन्सनने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत नाबाद अर्धशतकी खेळी साकारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद ४४० अशी मजल मारत २८४ धावांची आघाडी घेतली आहे.
पहिल्या दिवशी चार बळी घेत श्रीलंकेचा डाव १५६ धावांत गुंडाळण्याची किमया साधणाऱ्या जॉन्सनने गुरुवारी जिद्दीने फलंदाजी करीत सहा चौकारांच्या सहाय्याने ७३ धावा काढल्या. चहापानाआधी श्रीलंकेने फक्त चार धावांच्या अंतरात ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना तंबूची वाट दाखविल्यानंतर जॉन्सनने दोन भागीदाऱ्या करून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. जॉन्सनने सातव्या विकेटसाठी मायकेल हसी (३४) सोबत ६१ धावांची आणि आठव्या विकेटसाठी पीटर सिडल (१३) सोबत ५८ धावांची भागीदारी रचली.
त्याआधी क्लार्कने आपल्या कसोटी कारकीर्दीमधील २२वे शतक साजरे केले. याचप्रमाणे वर्षभरात सर्वाधिक धावा काढणारा ऑस्ट्रेलियन फलंदाजही क्लार्क ठरला. क्लार्कच्या खात्यावर १५९५ धावा जमा आहेत. याआधी २००५मध्ये रिकी पाँटिंगने १५४४ धावा काढल्या होत्या. वॉटसन वैयक्तिक ८३ धावांवर बाद झाला, तर क्लार्कने १४ चौकारांसह १०६ धावा केल्या. श्रीलंकेकडून धम्मिका प्रसादने १०२ धावांत ३ बळी घेतले.