ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि सलामीवीर अॅरॉन फिंच याने हरारे येथे सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत यजमान झिम्बाब्वेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली. त्याने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई करत तब्बल १७२ धावा ठोकल्या. या विक्रमासह त्याने स्वतःचा १५६ धावांचा विक्रम मोडीत काढला. फिंचच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वेपुढे २३० धावांचे आव्हान ठेवले आहे.

ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे-पाकिस्तान या संघांमध्ये सध्या झिम्बाब्वेमध्ये तिरंगी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आज झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि सलामीवीर फिंचने त्यांच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. फिंचने केवळ ७६ चेंडूत १७२ धावा केल्या. या तुफानी खेळामध्ये त्याने १६ चौकार आणि १० षटकार ठोकले. फिंचने २२६ च्या स्ट्राईकरेटने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई केली.

फिंच आणि शॉर्ट यांच्यात २२३ धावांची सलामीची भागीदारी झाली. शेवटच्या षटकात तिसऱ्या चेंडूवर ही भागीदारी तुटली. त्या पाठोपाठ चौथ्या चेंडूवर बाद झाला. मात्र त्यांनी त्या आधीच आणखी विक्रम रचला होता. त्यांच्यातील भागीदारी ही टी२० क्रिकेटमधील पहिली २०० धावांची भागीदारी ठरली.

आता झिम्बाब्वेला या मालिकेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी आजचा विजय आवश्यक आहे.