कसोटी क्रिकेटच्या नव्या पर्वाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. अनेक बदलांचा साक्षीदार असलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये एक बदल पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना दिवस-रात्र खेळवण्यात येणार असून पहिल्यांदाच लालऐवजी गुलाबी रंगाच्या चेंडूंचा वापर होणार आहे.
या सामन्यासाठी न्यूझीलंड नव्या रणनीतीने मैदानात उतरणार असल्याचे संकेत प्रशिक्षक माइक हेसन यांनी दिले. ‘‘गुलाबी चेंडू अधिक स्विंग होतो आणि रात्री तो अधिक धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे कसोटीचे पहिले दोन सत्र वगळल्यास अखेरच्या सत्रात फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरण्याचे कडवे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यामुळे स्टीव्ह स्मिथ आणि ब्रेंडन मॅकक्युलम या प्रतिस्पर्धी कर्णधारांना नव्या रणनीतीची आखणी करावी लागणार आहे,’’ असे हेसन यांनी सांगितले.